जगण्याचा स्वाद दुणा…

प्रत्येक क्षेत्रातले मानबिंदू वेगवेगळे असतात, हे एकदा मान्य झाले की, मिरवेलींनी मसाल्याच्या पदार्थांच्या साम्राज्याचे राज्ञीपद भूषविले तर काय बिघडले? पोर्तुगीजांचे पाय गोव्याला लागण्यापूर्वी तिखट मिरीच भारतीयांच्या जिभेचे चोचले पुरवीत होती. मिरीचे संस्कृतोद्भव नाव मरीची’. आताची आपली परिचित मिरची इथं आली आणि कानामागून येऊन तिखट झाली.

मलबारच्या किनार्‍यावरील उष्ण, दमट जंगले हे मिरीचे माहेर. मिरीचे अगदी गणगोत म्हणजे पिंपळी, विड्याच्या पानांचे वेल आणि विड्यावर लावतात ते लवंगेसारखे फळ कंकोळ. भारतात केरळ आणि आसामात मिरीची लागवड भरपूरच, पण भारताबाहेर इंडोनेशिया आणि मलेशिया हे दोन देशही सध्या मिरीच्या लागवडीत आणि उत्पादनात अग्रेसर आहेत.

मिरीची निर्यात हा इ.. पहिल्या शतकापासूनच भारतीय व्यापारातील मोठा भाग होता. प्राचीन इजिप्तच्या राज्यकर्त्यांनी मिरीच्या आणि इतर मसाल्याच्या पदार्थांवर जबरदस्त कर बसविला होता. भाडे, दंडाची रक्कम, हुंडा म्हणूनही मिरी स्वीकारली जात असे. एक किलो मिरी ही फारच दुर्मिळ भेट समजली जाई. जातिवंत घोडे, किंमती जवाहीर, बहुमोल गालिचांचीही किंमत मिरीच्यारूपात मोजली जाई. .. ४०४ मध्ये रोम जिंकल्यावर अ‍ॅलेरिक नावाच्या राजाने जी खंडणी मागितली, त्यात ५ हजार पौंड सोने आणि ३ हजार पौंड चांदीची मागणी केली होती त्याचबरोबर ३ हजार पौंड मिरीही मागितली होती. हे समजले की मिरीचे सामाजिक स्थान काय होते, याची कल्पना येते. थोडक्यात म्हणजे, ’एकातपत्रं जगत: प्रभुत्वम‍’ हे कालिदासाने केलेले दिलीपराजाचे वर्णन मिरीला लावण्यास काहीच हरकत नाही. टिचभर आकाराच्या, काळ्या रंगाच्या आणि सुरकुतलेल्या अंगाच्या मिरीने हे स्थान तिच्या अंगभूत गुणांमुळे मिळवले आहे.

pjimage-3-1-700x385

उत्तर केरळमधील अलेप्पी आणि तेलिचेरी हे दोन जिल्हे मिरीच्या लागवडीत अग्रगण्य आहेत. याखेरीज कर्नाटक, तमिळनाडू आणि आसामातही मिरी पिकते. आपण म्हणताना नेहेमी ’लवंगलता’ असे म्हणत असलो तरी लवंगेच्या वेली नसतात, तर छोटी झुडपेच असतात. मिरीच्या मात्र वेली असतात. पांगारा, शेवगा, नारळ फार काय सुपारीसारख्या सरळ वाढणार्‍या वृक्षांचे सहचर्य मिरीला फारच भावते. पण तिची वाढ मात्र थोडी सावकाशच होते. अर्थातच कालांतराने ती सहचर वृक्षाला सर्व बाजूंनी बिलगत जाते व आकाशाकडे झेपावते. तिचे सहचरही हा हिरवा साज मानाने मिरवत असतात. मिरीची पाने काहीशी मळकट, फिक्या हिरव्या रंगाची, जाडसर आणि काहीशी विड्याच्या पानाच्या आकाराचीच असतात. प्रत्येक पेरापासून अनेक बारीक मुळ्या फुटतात आणि त्यांच्याच सहाय्याने मिरी वर झेपावते.

पानांच्या बेचक्यातून वर येणार्‍या पुष्पमंजिर्‍या लोंबत्या असतात. जूनजुलैमध्ये तिला फुले येतात, तर डिसेंबरजानेवारीपर्यंत बारीक बारीक, हिरवी, गोल गोल फळे तयार होतात. फुले दोन प्रकारची असतात. स्त्रीपुष्पे आणि नरपुष्पे. मिरीचे घोस पानाआड दडलेले असतात. पिकायला लागल्यावर त्यांचा रंग लालभडक होऊ लागतो. प्रत्येक फळात एकच बी असते.

Piper_nigrum_drawing_1832

आपल्याला दोन प्रकारच्या मिर्‍यांची ओळख आहे. काळी मिरी आणि पांढरी मिरी. काळी मिरी मिळवण्यासाठी घोसातील फळे अर्धी पिकू द्यायची. नंतर फळे सुटी करून पातळ फडक्यात गुंडाळून ती पुरचुंडी उकळत्या पाण्यात ४५ मिनिटे धरायची. नंतर पुरचुंडी बाहेर काढून, फळे व्यवस्थित पसरून त्यांना सुमारे आठवडाभर उन्हात सुकवायचे. या सर्व प्रक्रियेत फळॆ काळी होतात, त्यांची त्वचा सुरकुतते, पण त्याचबरोबर त्यांना त्यांचा खास स्वाद आणि गंध प्राप्त होतो.

पांढरी मिरी करण्यासाठी पिकलेली फळे पाण्यात भिजत घालायची. ५ दिवसात त्यांची साल सुटून येते. मग ही फळे उन्हात वाळविली की पांढरी होतात. मिरीचा अस्सल स्वाद आणि तिखटपणा हा वरच्या सालीत असतो. त्यामुळे काळी मिरी पांढर्‍या मिरीपेक्षा जास्त झणझणीत असते.

Dried_Peppercorns

पाण्याचा चांगला निचरा होणारी लाल माती मिरीच्या लागवडीसाठी उत्तम. पण आता पुण्यात आणि आसपासही मिरी छान वाढते. मलयगिरीवर मिरी इतकी होते की, तिच्या फुलांच्या गंधाने पक्षीदेखील भांबावतात, असा उल्लेख कालिदासाने केला आहे. मिर्‍यांचा वास त्यातील एका अर्कामुळे, तर तिखटपणा पायपरिन आणि पायपरिडिनसारख्या अल्कलाईन पदार्थांमुळे तयार होतो.

कोणत्याही मसाल्यात मिरी हवीच. ती जंतुनाशक आहे, हे आधुनिक शास्त्रही मानते. पाचक रसाचे स्त्राव निर्माण करण्यास ती आवश्यक आहे, तसेच ती पोटदुखीही थांबवते. ती शीतकारक पेयांमधे आणि मद्यातही वापरतात. आयुर्वेदात मिरीला मानाचे स्थान आहे ते तिच्या कफनाशक आणि वातनाशक गुणधर्मामुळे. चरक संहिता आणि बृहत्संहिता हे ग्रंथ कॉलरा आणि टायफाईड म्हणजे विसुइका आणि विषमज्वरात मिरी वापरण्यास सांगतात. कृमीनाशक म्हणूनही ती माहित आहे. त्रिकूट म्हणजे तीन तिखट पदार्थ मिरी, पिंपळी आणि सुंठ हे पाचकरस निर्मितीस कारणीभूत ठरतात. मिरी कफ आणि वातनाशक आहे, पण ती पित्तकारकही आहे.

Le_livre_des_merveilles_de_Marco_Polo-pepper (1)

प्राचीन काळी मिरी महत्वाची का होती? ज्या काळात शीतपेट्या उपलब्ध नव्हत्या, त्याकाळी मांस कसे टिकवायचे हा एक मोठा प्रश्न होता. मांस मिरपूडीत घोळले की ते दिर्घकाळ टिकत असे शिवाय ते अधिक रूचकरही होत असे. मद्य अधिक उत्तेजक आणि सुगंधी करण्यासाठी रोमन साम्राज्यात मिरीला प्रचंड मागणी होती. आजही भारताला परकीय चलन मिळवून देणार्‍या पदार्थात मिरीच क्रम बहुधा खूप वरचा असेल.

युरोपात मिरची सहज उपलब्ध असूनही तेथे मिरीची असलेली मागणी पूर्ण करण्यासाठीच अनेक खलाशी आणि प्रवाशांनी आपली जहाजे पूर्वेकडे हाकारली आणि यातूनच पुढील काळात जगाच्या इतिहासात भर पडली.

vascodegama

डॉ. हेमा साने

6 thoughts on “जगण्याचा स्वाद दुणा…

Add yours

 1. कौस्तुभ, खूपच छान व उपयुक्त माहिती.👍

  Like

 2. वा! रंजक माहिती!!
  सुंदर लेख!
  मिरी मुळे जगाच्या इतिहासात भर पडली. 😊😊
  हे नव्हतं माहीत!! 😀

  Like

 3. आंब्याच्या झाडावर चढवलेला काळ्या मिरीचा वेल नाही, असं घर तर कोकणात शोधून सापडणार नाही.

  Like

 4. काळी मिरी Bio enhancer म्हणूनही काम करते. पाश्चात्य व आयुर्वेदिक अशा दोन्ही प्रकारच्या औषधांबरोबर घेतली तर कमी डोस वापरूनही चांगला परिणाम दिसतो. डाॅ. माशेलकरांनी यांवर काम केले आहे.

  Like

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

Create a free website or blog at WordPress.com.

Up ↑

%d bloggers like this: