ईस्ट इंडिया कंपनी मोठ्या प्रमाणात चहा खरेदी करत होती व त्या बदल्यात चिनी व्यापारी त्यांच्याकडून चांदीची मागणी करत असत. पण एवढ्या मोठ्या प्रमाणात चहा खरेदी करण्यासाठी चांदी आणायची कुठून हा ईस्ट इंडिया कंपनीसमोर मोठा प्रश्न होता. त्यावर त्यांनी उत्तर शोधले, स्पॅनिश लोकांनी मेक्सिको, पेरु आणि बोलिव्हीया येथे आपल्या वसाहती स्थापन केल्या होत्या. या सगळ्या देशांमध्ये मोठ्या प्रमाणात चांदीच्या खाणी स्पॅनिश लोकांनी चालू केल्या. ईस्ट इंडिया कंपनीने स्पॅनिश लोकांना साखर आणि इतर मसाल्याचे पदार्थ विकून त्याबदल्यात चांदी घेण्यास सुरुवात केली. १७३० साली ईस्ट इंडिया कंपनीने चहाच्या खरेदीसाठी ५८२११२ Taels (वजनाचे चिनी माप. ३७.८ ग्राम) म्हणजे सुमारे २२०००० किलो चांदी चीनमध्ये आणली. १७५६ ते १७६३ या सात वर्षामध्ये युरोपमधे युद्ध परिस्थितीमुळे चांदीचा तुटवडा निर्माण झाला. ईस्ट इंडिया कंपनीला यामुळे मोठा फटका बसला. शेवटी त्यांना मकावमधील सावकारांकडून कर्ज घेऊन चहाची खरेदी करावी लागली. याचा परिणाम अर्थातच चहाच्या किमतीवर झाला. १७७२ साली इंग्लंडमध्ये चहावर ६४% कर आकारला जात होता तो १७७२ मध्ये १०६%, १७७७ मध्ये ११९% इतकी करामध्ये भरमसाठ वाढ झाली. यामुळे युरोपमध्ये चहाची तस्करी मोठ्या प्रमाणात चालू झाली. १७७० सालची एक नोंद सांगते की त्या वर्षी इंग्लंडमध्ये जवळपास ३२ लाख किलो चहाची तस्करी करण्यात आली. याच काळात इंग्लंडला अधिकृतरीत्या आणलेल्या चहा होता २३ लाख किलो. या तस्करीमध्ये सुमारे २५० फ्रेंच, डच, पोर्तुगीज, स्विडीश जहाजे सामील होती.
चहाच्या खरेदीसाठी ईस्ट इंडिया कंपनीला कायमच चांदीची गरज भासत असे. परंतु राजकीय अस्थिरतेमुळे चांदीचा तुटवडा निर्माण झाला की त्याचा परिणाम थेट चहाच्या व्यापारावर होत असे. यावर ईस्ट इंडिया कंपनीने एक अफलातून शक्कल लढवली. साधारणतः १७०० सालापासून त्यांनी भारतातून अफूचा व्यापार करण्यास सुरुवात केली. अफू मोठ्या प्रमाणात पूर्वेकडील देशांमध्ये नेण्यात येऊ लागला. Andres Ljungstedt या स्विडीश इतिहासकाराने १७२० साली पहिल्यांदा भारतातील कोरोमंडल बंदरातून अफूच्या पेट्या मकावमध्ये आणल्याची नोंद केली आहे. यानंतर नऊ वर्षांनी चिनी राजवटीने ईस्ट इंडिया कंपनीच्या अफूच्या व्यापारावर बंदी आणली. बंदी असली तरी हा व्यापार थांबला नाही. अनेक चिनी व्यापारी कलकत्ता येथून अफूची खरेदी करत आणि भ्रष्ट चिनी अधिकार्यांना लाच देऊन चीनमध्ये त्याची विक्री करत. १७५० साली अफूच्या एका पेटीचा भाव साधारणपणे १५ किलो चांदी येवढा होता. ईस्ट इंडिया कंपनीने लढवलेल्या शक्कलीमुळे त्यांची चांदीची गरज भागू लागली. १७७६ साली ६५ किलो अफूच्या एका पेटीची किंमत ३०० स्पॅनिश सिल्व्हर डॉलर येवढी होती. चिनी अधिकार्यांना लाच देऊन राजरोसपणे हा व्यापार चालू राहिला. १७८४ साली मकाव मध्ये ७२६ अफूच्या पेट्या आणण्यात आल्या तर १८२८ साली ही संख्या वाढून ४६०२ पेट्या इतकी झाली. इथेच १९ व्या शतकात झालेल्या Opium War ची मुळे रुजली. ईस्ट इंडिया पूर्वेकडे अफू विकून आपला व्यापार वाढवत होती पण तिकडे इंग्लंडमध्ये याची गंधवार्ताही नव्हती.

१८ व्या शतकाच्या अखेरीस चहाची तस्करी मोठ्या प्रमाणात वाढली होती. त्यामुळे ईस्ट इंडिया कंपनीला मोठ्या प्रमाणात फटका बसत होता. यावर उपाय म्हणून त्यावेळचे इंग्लंडचे पंतप्रधान विल्यम यांनी चहावरचा कर कमी केला आणि मालमत्ता करात वाढ करण्यात आली. इंग्लंडमध्ये मालमत्ता कर हा घरांच्या खिडक्यांच्या संख्येवर आकारला जात होता. या Window Tax मध्ये मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आली. चहावरील कमी केलेल्या करामुळे तस्करीला मोठ्या प्रमाणात आळा बसला आणि १७५३ साली चहाची आयात २२ लाख ६७ हजार किलोवरून १७८४ साली ६० लाख किलोंवर गेली. नेपोलियनशी झालेल्या युद्धानंतर चहावर पुन्हा ९०% कर बसवला गेला.
तस्करीबरोबर इंग्लंडमध्ये चहात भेसळ करण्याचा आणि बनावट चहा बनवण्याचा उद्योग मोठ्या प्रमाणात फोफावला. १७३० साली चहामध्ये उसाची मळी, माती किंवा लाकडाचा भुसा याची भेसळ करणार्याला अर्ध्या किलोसाठी १० पाउंड असा जबरी दंड आकारला जात असे. १७७७ साली सुमारे १० लाख किलो भेसळ केलेला किंवा बनावट चहा इंग्लंडमध्ये विकला गेला. या चहामध्ये रानटी प्लमच्या खोडाचे तुकडे, बर्चची सालं, मेंढ्यांच्या लेंड्या आणि लाकडाची राख मिसळली जात असे. यानंतर केवळ दंडाच्या शिक्षेमध्ये कैदेच्या शिक्षेची भर घालण्यात आली. तसेच चहामधील भेसळ कशी ओळखावी याची प्रात्यक्षीकेही अनेक ठिकाणी दाखवली जात.

अमेरिकेत चहा पोहोचला १७ व्या शतकात. डचांनी पहिल्यांदा अमेरिकेत चहा आणला. बोस्टनमध्ये पहिल्यांदा बेंजामीन हॅरीस आणि डॅनिअल व्हर्ननॉन या दोन व्यापार्यांनी पहिल्यांदा चहा विक्रीचे परवाने मिळवले. पण असे असले तरीही अमेरिकेतील अनेक भागांमध्ये चहाबद्दल मोठे अज्ञान होते. काही ठिकाणी बर्याच वेळ चहा उकळून प्यायला जात असे तर काही ठिकाणी चहाची पाने मीठ आणि लोणी टाकून खाल्ली जात होती. १७२० सालापासून इंग्लंडमधून चहा आयात करण्यास सुरुवात झाली. याच काळात नेदरलॅंड, फ्रान्स, स्विडन आणि डेन्मार्कवरून मोठ्या प्रमाणात चहाची तस्करी चाले.
ईस्ट इंडिया कंपनीला ब्रिटिश वसाहतींमध्ये चहा परस्पर विकण्यास मनाई होती. ईस्ट इंडिया कंपनी आपला चहा लंडनमध्ये आणत असे. तेथे मग या चहाचा लिलाव केला जाई आणि सरकारने निवडलेल्या दलालांमार्फतच हा चहा वसाहतींमध्ये विकला जात असे. यामुळे वसाहतींमध्ये विकल्या जाणार्या चहाची किंमत अतिशय चढी असे. याचा फायदा तस्कर उठवत. १७६९-७० साली बंगाल प्रांतात मोठा दुष्काळ पडला. मुगल राजवटीने ईस्ट इंडिया कंपनीला बंगाल प्रांतातून कर वसूल करण्याचे अधिकार दिले होते. पण दुष्काळामुळे ईस्ट इंडिया कंपनीला मोठ्या आर्थिक अडचणीला सामोरे जावे लागले. इतके की अगदी नादारी जाहीर करण्याची वेळ आली. इकडे इंग्लंडमध्ये मग असा ठराव करण्यात आला की ईस्ट इंडिया कंपनीला अमेरिकेत चहा विकण्यास परवानगी द्यावी आणि मग कंपनीला झालेला तोटा त्यातून भरून काढावा. याचा फायदा उठवत ईस्ट इंडिया कंपनीने अमेरिकेत कमी दरात चहा विकण्यास सुरुवात केली. तस्करी केलेल्या चहाच्या किमतीपेक्षा हे दर कमी होते. पण याचे दूरगामी होणार्या परिणामांची जाणीव स्थानिक लोकांना झाली. चहाच्या विक्रीमध्ये मक्तेदारी निर्माण झाल्यावर ब्रिटिश सरकार चहावरील करात मनाप्रमाणे वाढ करण्याची शक्यता निर्माण झाली आणि मग या गोष्टीला विरोध होऊ लागला आणि तसेच घडले. तेंव्हा स्थानिक ब्रिटिश सरकारने Townshend Act या कायद्याखाली कराचा बोजा स्थानिक लोकांवर लादला.

१७७३ मधील डिसेंबर महिन्यातील ती एक थंडगार रात्र होती. स्वातंत्र्य चळवळीतीले क्रांतिकारक बोस्टन बंदराकडे निघाले. बंदरात डार्टमाऊथ, एलेनॉर आणि बिव्हर ही जहाजे नांगरून उभी होती. या तीनही जहाजांवर चहाच्या पेट्या भरलेल्या होत्या. ते या जहाजांवर चढले आणि त्यांनी या पेट्या फोडून त्यातील चहा समुद्रात फेकून दिला. सुमारे ४१ हजार किलो येवढा चहा समुद्रात टाकला गेला. Boston Tea Party या नावाने माहिती असलेली ही घटना अमेरिकन राज्यक्रांतीची सुरुवात होती. असेच उठाव न्यूयॉर्क, फिलाडेल्फीया अशा अमेरीकेतील दहा वेगवेगळ्या शहरात घडले. सगळ्यात गंमतीची गोष्ट अशी की या उठावात फक्त क्रांतिकारक नव्हते. ईस्ट इंडियाने चहाचे भाव पाडल्यामुळे ज्या तस्करांचे मोठे नुकसान झाले होते त्यांचीही फूस या उठावांना होती. चहांवरील करांमुळे जागतिक इतिहासात घडलेली ही अतिशय महत्त्वाची घटना आहे. या घटनेनंतर अमेरिकन लोकांचे चहावरील प्रेम कमी झाले आणि ते कॉफीकडे वळले असावेत.
ईस्ट इंडिया कंपनी चीनमधून चहा खरेदी करत असे. यामुळे चिनी लोकांची मक्तेदारी निर्माण झाली होती. ही मक्तेदारी मोडून काढण्याच्या दृष्टीने मग कंपनीने पावले उचलण्यास सुरुवात केली. भारतामध्ये त्यांनी आपले पाय भक्कमपणे रोवले होतेच. भारतात चहाच्या लागवडीच्या दृष्टीने मग कंपनीने हालचाल सुरू केली. १८२३ साली ब्रिटिश व्यापारी रॉबर्ट ब्रुस याने ब्रम्हपुत्रा नदीतून प्रवास करून रंगपूर येथे पोहोचला. तेथे त्याची गाठ पडली ती तेथील स्थानिक आदिवासी लोकांशी. त्याला असे आढळून आले की हे स्थानिक सिंगफो आदिवासी पिढ्यानपिढ्या डोंगरात जंगली चहाची लागवड करत होते आणि तो चहा पित होते. त्याने नोंदवलेले निरीक्षण सांगते की हे सिंगफो चहाची पाने साठवून ठेवण्यासाठी बांबूच्या पोकळीत त्यांना घालून त्यांना विस्तवावर भाजून वाळवतात किंवा जमिनीमध्ये खड्डा करून त्यात आंबवलेली पाने उकळून साठवतात. १८३४ साली भारतात चहाची लागवड कुठे करता येईल याचा आढावा घेण्यासाठी एक समिती नेमली गेली. १८३६ साली कलकत्ता येथे चीनमधून आणलेल्या चहाच्या बियांपासून २० हजार चहाची रोपटी तयार केली गेली आणि ती आसाम, कुमाऊ, देहरादून, मद्रास येथे पाठवण्यात आली. याचबरोबर कलकत्त्यापासून ३०० किमी वर असलेल्या दार्जिलींगलाही ही रोपटी पाठवली. १८३२ साली दक्षिण भारतातल्या निलगिरी टेकड्यांवर चहाच्या लागवडीला सुरुवात झाली. या पूर्वीच्या भारतातल्या चहाबद्दलच्या कुठल्याही नोंदी मिळत नाही.

याच सुमारास लंडनमधील काही व्यापाऱ्यांनी आसाम टी कंपनीची स्थापना करून त्याचे रोखे बाजारात आणले. अनेक ब्रिटिश तरुण व्यापारी कलकत्त्यामध्ये आपल्या परिवाराला मागे सोडून ब्रम्हपुत्रेतून प्रवास करत आसाममधील घनदाट जंगलात जंगली श्वापद, हिवताप, कॉलरा अशा संकटांवर मात करत चहाचे मळे लावण्यासाठी तेथे पोहोचले. आसाममध्ये मोठ्या प्रमाणात चहाची लागवड करण्यासाठी जंगलतोड करणे, रोपांची लागवड करणे, चहाच्या पानांची तोडणी करणे यासाठी मोठ्या प्रमाणात मनुष्यबळ लागणार होते. मग त्यासाठी शेजारील पूर्व बंगालमधून मोठ्या प्रमाणात कामगार आणले गेले.
श्रीलंकेमध्ये मोठ्या प्रमाणात कॉफीची लागवड करण्यात येत होती. १८६९ साली या कॉफीच्या झाडांवर एक रोग पडला. पुढील १५ वर्षांमध्ये श्रीलंकेतील एक लाख हेक्टरवरील कॉफीचे मळे या रोगामुळे नष्ट झाले. १८६७ साली पहिल्यांदा श्रीलंकेमध्ये चहाची लागवड कॅंडी येथे करण्यात आली. त्यानंतर श्रीलंकेत चहाच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाढ झाली. श्रीलंकेतही मग मनुष्यबळाचा तुटवडा निर्माण झाला. मग त्यासाठी भारतातून तमिळ लोकांना तेथे नेण्यात आले. आज आसाम आणि श्रीलंकेत चहाच्या लागवडीसाठी स्थलांतरित झालेल्या या कामगारांमुळे या दोन्ही प्रांतात अशांतता आहे.
आता एक रंजक कहाणी एका शर्यतीची. चहाच्या व्यापारावर ईस्ट इंडिया कंपनीची मक्तेदारी झाली होती. कंपनीला जास्तीत जास्त चहा लंडनमध्ये नेऊन मोठ्या प्रमाणात नफा कमवायचा होता. चहा घेऊन जाणारी जहाजे ही केप ऑफ गुड होपला वळसा घालून लंडनला पोहोचत. या प्रवासाला सुमारे आठ महिने लागत. त्यामुळे वेगाने चालणार्या जहाजांची गरज भासू लागली. Tea Clipper यांची सुरुवात झाली १८३४ सालापासून. या वेगवान जहाजांची सुरुवात झाली ती अफूच्या व्यापारातून. कलकत्त्याहून अफू घेऊन ही जहाजे मकावला पोहोचत. तेथे लहान होड्यांमधून अफू बंदरात उतरवली जात असे व ती चीनमधील तस्करांना विकली जात असे. या सगळ्या वेगवान जहाजांमध्ये फाल्कन नावाचे जहाज अतिशय प्रसिध्द होते. १८३९ साली पहिले १५० टनी ’Aberdeen bow’ हे ब्रिटिश क्लिपर बनवले गेले. त्यानंतर अशी वेगवान जहाजे निर्माण करण्याची स्पर्धाच सुरू झाली.

तर गोष्ट आहे १८६६ सालातली. Ariel ह्या जहाजात कॅंटोन येथे चहाच्या पेट्या भरण्यात येत होत्या. Ariel बरोबरच Fiery Cross, Taeping, Serica आणि Taitsing ह्या जहाजातही चहाच्या पेट्या भरण्याचे काम अहोरात्र चालले होते. पुढील तीन दिवसांमध्ये ही सगळया जहाजांनी प्रस्थान केले. Feiry Cross या जहाजाने आघाडी घेतली आणि ते अंजेर येथे पोहोचले. येथून पुढचा थांबा होता मॉरिशसचा. आग्नेय दिशेने वाहणार्या वार्याचा फायदा घेत Fiery Cross ने २४ जूनला ३२८ मैलांचा प्रवास केला. पाचही जहाजांवर अतिरिक्त सुट्या भागांचा मोठा साठा होता. जहाजाचे शीड फाटल्यास ३०-४० हजार वर्ग फुटाचे कापड सगळ्या जहाजांवर होते. “जहाजांवरील नावाडी, सुतार आणि सगळेच कर्मचारी हे अहोरात्र जहाज वेगाने पुढे जाण्यासाठी काम करत आहेत” Ariel चा कप्तान के याने नोंदवहीत केलेली ही नोंद.
Fiery Cross ४७ दिवसात केप ऑफ गुड होपला वळसा घातला. Fiery Cross च्या मागे काही तासातच Ariel ने व त्यामागे Taeping, Serica आणि Taitsing ने हा वळसा पूर्ण केला. यानंतर सेंट हेलेना पासून Taeping जहाजाने आघाडी घेतली. ४ ऑगस्ट रोजी एका दिवसात Taeping, Fiery Cross आणि Ariel या तीन जहाजांनी इक्वेडोर पार केले. केप वार्दे ते अॅझोर या प्रवासात Taeping नी तीन दिवसांची आघाडी घेतली. उरलेल्या चार जहाजांनी एकाच दिवसात अॅझोर ओलांडले. ५ सप्टेंबर रोजी Ariel ने Taeping ला गाठले आणि ही दोन्ही जहाजे एकमेकांच्या बाजूला १४ नॉटिकल वेगाने चालत इंग्लिश खाडीपाशी पोहोचली. या सगळ्या शर्यतीत Taeping ने बाजी मारली. Ariel ही चीनमधून बाहेर पडलेले पहिले जहाज असले तरी Taeping ने २० मिनिटांच्या फरकाने ही १६००० मैलांची शर्यत ९९ दिवसात पूर्ण केली. The Great Tea Race या नावाने ही शर्यत ओळखली जाते.

१८७४ साली ईस्ट इंडिया कंपनीने भारतातून आपला गाशा गुंडाळला आणि या मक्तेदारीने व लोभाने भरलेला चहाचा प्रवास थांबला.

१९ व्या शतकाची अखेर आणि २० व्या शतकातली चहाच्या व्यापारात मोठमोठ्या कंपन्या उतरल्या. १९ व्या शतकाच्या अखेरीस लंडनमध्ये सुमारे ४०-५० वेगवेगळ्या ब्रॅण्डचे चहा विकले जात होते. छपाईची मोठ्या प्रमाणात सुरुवात झाली. वर्तमानपत्रे, नियतकालीके, गॅझेटिअर्स आणि पुस्तकांची मोठ्या प्रमाणात छपाई होऊ लागली. यामुळे जाहिरात हे मोठे क्षेत्र खुले झाले. चहाच्या जाहीरातींची सुरुवात झाली १६५८ साली. Mercurius politicus या लंडनमध्ये प्रकाशीत होणार्या नियतकालीेकामध्ये “That Excellent, and by all Physicians approved, China Drink, called by the Chineans, Tcha, by other Nations Tay aliasTee, is sold at the Sultaness-head, a Cophee-house in Sweetings Rents by the Royal Exchange, London.” अशी जाहिरात प्रसिध्द झाली. या नंतर ईस्ट इंडिया कंपनीने लंडनमध्ये आणलेला चहा विकत घेणार्या अनेक व्यापार्यांनी चहाच्या जाहिराती करायला सुरुवात केली. या जाहिराती अतिशय रंजक आहेत.

आता गोष्ट दोन जगप्रसिद्ध चहाच्या कंपन्यांची ही कथा. या कंपनीची सुरुवात झाली श्रीलंकेतून. थॉमस लिप्टन या किराणा दुकानदाराच्या मुलाने मांस, लोणी आणि अंडी विकण्याची ३०० दुकाने संपूर्ण इंग्लंडमध्ये काढली. १८९० साली त्याने त्याच्या श्रीलंकेच्या भेटीत अनेक चहाचे मळे विकत घेतले आणि Lipton Circus नावाने कोलंबोमध्ये आपले कार्यालय थाटले. त्याचा विचार असा होता की मधल्या दलालांना टाळून चहाच्या मळ्यातून थेट ग्राहकांपर्यंत चहा पोहोचवायचा. थॉमसने कल्पकतेने याची जाहिरात करून ते प्रत्यक्षात आणले.


१९ व्या शतकाच्या पूर्वार्धातच ईस्ट इंडिया कंपनिची चहावरील मक्तेदारीला ओहोटी लागली. इतरही बर्याच कंपन्यांनी चहाचा व्यापार सुरू केला. त्यातील एक महत्वाची कंपनी म्हणजे ब्रुक बॉंड. आर्थर ब्रुक याने १८६९ साली मॅन्चेस्टरमध्ये एक चहाचे छोटेसे दुकान चालू केले. पुढच्याच वर्षी त्याने मोठ्या प्रमाणात चहाची विक्री चालू केली. १९०३ साली ब्रुक बॉंडने रेड लेबल चहा वितरीत करायला सुरुवात केली. २० व्या शतकाच्या मध्यापर्यंत ब्रुक बॉंड ही जगातील सगळ्यात मोठी चहा बनवणारी कंपनी झाली होती. त्यानंतर ब्रुक बॉंड ही कंपनी युनीलिव्हर या कंपनीने विकत घेतली.
आता चहाविषयी असलेले वादाचे दोन मुद्दे. एक म्हणजे चहात दुध घालावे की नाही? दुसरा म्हणजे चहा की कॉफी? चहामध्ये दुध घालून पिण्याबद्दलची पहिली नोंद १६५५ साली डच प्रवासी Jean Nieuhoff याने केली आहे. डच ईस्ट इंडिया कंपनीतर्फे जेव्हा त्याने चिनी राजाला भेट दिली तेव्हा झालेल्या मेजवानीमध्ये दूध घातलेला चहा त्यांना देण्यात आल्याचे त्याने म्हणले आहे. असे असले तरी चहामध्ये दूध घालण्याचे श्रेय जाते ते एका फ्रेंच स्त्रीला. Madame de la Sablière या बाईनी पॅरिसमधील आपल्या सलूनमधे पहिल्यांदा चहात दूध घालून पिण्यासाठी दिला अशी नोंद आढळते. चहा की कॉफी हा वाद अनेक शतके चालू राहिलेला आहे. अर्थातच यात श्रेष्ठ कोण हे ठरवणे शक्य नाही. ज्याला जे आणि जसे आवडेल ते त्याने प्यावे हा मध्यममार्ग.

२० व्या शतकातला चहाचा प्रवास हा तितकासा रंजक नाही. तो आहे नवनवीन टी इस्टेटचा, वेगेवेगळ्या कंपन्यांनी बाजारात आणलेल्या अनेक प्रकारच्या चहांचा. पिको, डस्ट, ऑरेंज पिको, सिटिसी (crush-tear-curl) असे अनेक चहाचे प्रकार आपण ऐकतो. ते बनविण्याची प्रक्रियेत तांत्रिक किचकटता आहे. (त्यामुळे त्याबद्दल वाचताना मलाही कंटाळा आला म्हणून ती माहिती मी वगळली.)
अनेक वनस्पतींनी जगाच्या इतिहासात खळबळ माजवली. चहा हा त्यातीलच एक. अशी ही चहाच्या प्रवासाची लांबलेली कहाणी आता इथे थांबवतो.
संदर्भ
All About Tea Vol. I and Vol. 2
Ten Tea Parties
आणि असे अनेक ग्रंथ…..
छान! वर्तमानपत्रातील चहाच्या जाहिराती आणि चहाच्या कंपन्यांची कथा भारीच!
LikeLike
धन्यवाद आशा
LikeLike
There is one tea estate in DEHRADUN near IIP, may be it is one of the primay estate of the first flush.
LikeLike