एकच प्याला… भाग २

पश्चिमेकडील देशांना चहाची ओळख झाली ती १६ व्या शतकात. युरोपमधे छापील स्वरुपात चहाचा उल्लेख सापडतो तो इ.स. १५५९ मध्ये. Giambattista Ramusio या इटलीच्या भूगोल शास्त्रज्ञाने लिहिलेल्या ’Chai Catai’ या आपल्या प्रवासवर्णनात. आपल्या प्रवासात तो अनेक प्रवाश्यांना भेटला. हाजी मुहम्मद हा त्यातीलच एक. त्याने पहिल्यांदा रामुसीओला चहाची ओळख करून दिली. हाजी मुहम्मद (रामुसीओच्या शब्दात Chaggi Memet) याच्यावर एक प्रकरणच त्याच्या प्रवासवर्णनात आहे. हाजीने त्याला या झाडाच्या पानांपासून बनविण्यात येणार्‍या पेयाची ओळख करून दिली. रामुसीओच्या आधी म्हणजे साधारणतः १२ व्या शतकात मार्को पोलोने चीनला भेट दिली होती. परंतु मार्को पोलोने लिहिलेल्या प्रवासवर्णनात चहाचा उल्लेख मात्र सापडत नाही. मार्को पोलो हा कुब्लाई खानच्या टोळीबरोबर बरीच वर्षे राहिला होता. मार्को पोलो याने खराखुरा प्रवास न करता इतर प्रवाशांनी सांगितलेल्या माहितीवरून लिहिल्या असाव्यात असे काही संशोधकांचे म्हणणे आहे.

Chai Catai मधील चहाचा पहिला उल्लेख

वास्को द गामाने केप ऑफ गुड होपला वळसा घालून भारतीय उपखंडापर्यंत जाण्याचा मार्ग शोधून काढला. पण पोर्तुगीज इथेच थांबले नाहीत. ते पुढे पूर्वेकडील मलय देश आणि चीनपर्यंत पोहोचले. पोर्तुगीज हे पहिले युरोपियन होते ज्यांनी चीनच्या भूमीवर आपले पाऊल ठेवले. तेथे त्यांना व्यापाराच्या बर्‍याच संधी दिसून आल्या. पोर्तुगीजांचे स्वागत चिनी राजवटीने थंडपणे केले. त्यांना या बाहेरून आलेल्या प्रवाशांबद्दल मनात शंका होत्या. पोर्तुगीजांनी आपला एक राजदूत चिनी राजाला भेटायला पाठवला. त्याने आपण आक्रमण करण्यासाठी आलो नसून विनिमय करण्यासाठी आलो असल्याचे राजाच्या गळी उतरवले. त्यानंतर त्यांना मकाव येथे कॅंन्टोन नदीच्या पश्चिमेकडे जागा दिली. Gasper da Cruz हा पोर्तुगीज पाद्री चीनमधे १५५६ साली पोहोचला. त्याने चहाबद्दल बर्‍याच नोंदी करून ठेवल्या आणि जेव्हा १५६० साली तो पुन्हा पोर्तुगालला परतला तेव्हा त्याने या केलेल्या नोंदी छापून प्रकाशित केल्या. त्याने लिहिले आहे की ’चीनमध्ये आलेल्या प्रत्येक पाहुण्याचे स्वागत हे ’चा’ नावाचे चवीला तुरट आणि औषधी गुणधर्म असलेल्या पेयाने केले जाते.’ चहाबद्दल छापलेली ही पहिली नोंद आहे.

१५६५ साली फादर अल्मेडा हा मिशनरी जपानमध्ये पोहोचला. त्यानेही जपानमधील चहाबद्दल आपल्या पत्रात लिहून पाठवले. १५८८ साली Giovanni Maffei या लेखकाने अल्मेडाचे पत्र प्रकाशित केले. यानंतर अनेक युरोपियन प्रवाशांनी आपल्या प्रवासवर्णनांमध्ये चहाचा उल्लेख केलेला आहे. यात मुख्यतः पोर्तुगीज आणि फ्रेंच पाद्री यांची प्रवासवर्णने आहेत.

चहा युरोपमध्ये पोहोचला पण तेथील लोकांनी तो लगेचच स्विकारला नाही. अनेक प्रवाशांनी आणि वैद्यांनी त्याचे औषधी उपयोग लोकांसमोर आणले. यात पहिला उल्लेख केला आहे तो एका पोर्तुगीज प्रवाशाने. पेद्रो टेक्सीरा हा प्रवासी १५८६ साली लिस्बन हून निघाला. त्याने गोवा, मलाक्का आणि प्रशिया असा प्रवास केला आणि तो भारतातून तो इटलीत आला आणि त्याने ’Kings of Persia’ हे पुस्तक प्रकाशित केले. त्यात त्याने चहाचे अनेक औषधी गुणधर्म सांगितले आहेत. ’कडवट असलेले हे पेय हे पोटासाठी चांगले आहे आणि ते मुळव्याधीवर रामबाण उपाय आहे. तसेच पचन शक्ती वाढवणारे आहे.’ डच वैद्य Nikolas Dirx याने लिहून ठेवलेल्या नोंदींमध्ये म्हणले आहे ’चहामुळे तारुण्य वाढते, ताकद वाढवणार्‍या या पेयामुळे मुतखडा होत नाही. डोकेदुखी, दमा, बिघडलेल्या पोटावर चहा हे चांगले औषध आहे.’ अशा अनेक औषधी गुणधर्माच्या वर्णनांमुळे युरोपियन लोकांमध्ये चहाविषयी आकर्षण निर्माण झाले.

पोर्तुगीजांनी मकाव येथे बस्तान बसवले आणि प्रामुख्याने चिनी रेशमी कापड पोर्तुगालला नेत असत. अनेक पोर्तुगीज जहाजे आता मकावकडे ये जा करत असत. याच जहाजामधून १५९५ साली डच प्रवासी Jan Hugo van Linschooten याने चीन आणि भारताचा प्रवास केला. परतल्यावर त्याने आपल्या प्रवासाची हकिकत नोंदवून ठेवली. याकडे डच व्यापार्‍यांचे लक्ष गेले आणि त्यांना यात व्यापाराची मोठी संधी असल्याचे जाणवले. डचांनी तसे प्रयत्नही चालू केले. आपली मक्तेदारी संपण्याच्या भीतीने पोर्तुगीजांनी आपल्या जहाजांवर डच लोकांना प्रवास करण्यास मनाई करण्यात आली. या विरोधाकडे दुर्लक्ष करून कॉर्नेलियस हॉटमन याच्या अधिपत्याखाली मग चार डच जहाजे जावा येथे पोहोचली. स्थानिक लोकं डच जहाजांवरील व्यापार्‍यांशी व्यापार करण्यास उत्सुक होती. लवकरच येथून युरोपमध्ये न मिळणारे मसाल्याचे पदार्थ, रेशीम असा बराच माल घेऊन परतीला लागले. ह्या जहाजांवरील माल नेदरलॅंड मधे पोहोचायच्या आतच आणखी आठ जहाजे पूर्वेकडे निघाली. १६०७ मध्ये डच ईस्ट इंडिया कंपनीचे एक जहाज जपानला पोहोचले आणि तेथे त्यांची चहाशी ओळख झाली. तेथून हा चहा मकाव इथल्या डच ईस्ट इंडिया कंपनीच्या गोदामात आणला गेला. युरोपियन लोकांनी चहाची वाहतूक केल्याची पहिली नोंद आहे. त्यानंतर डच ईस्ट इंडिया कंपनीने १६१० साली पहिल्यांदा चहा युरोपमध्ये नेला. डच लोकांनी पाश्चिमात्य देशांना चहाची ओळख करून देण्यात मोठी आघाडी घेतली. डचांनी १६१९ साली बटाव्हीया हे नवीन शहर वसवले. त्यांचा मसाले आणि रेशमाचा व्यापार प्रचंड जोरात चालू झाला.

डचांनी वसवलेल्या बटाव्हीया शहराचे रेखाचित्र

याच सुमारास म्हणजे १६१६ साली इव्हान पेट्रोफ आणि बुर्नाश यालिशेफ या रशियन प्रवाशांनी चीनला भेट दिली. पण त्यांनी केलेल्या नोंदींकडे फारसे गंभीरपणे बघितले गेले नाही. झारने मंगोल राजा अल्तीन खान याच्याशी सहकार्याचा करार करण्यासाठी आपले दूत त्याच्याकडे पाठवले. पेट्रोव्ह जेव्हा आल्तीन खानकडे पोहोचला तेव्हा त्यांचे स्वागत करण्यात आले आणि त्यानी वर्णन केले आहे की ’आम्हाला मेजवानी दिली गेली. टेबलबर बदकाचे, सशाचे, गोमांस असे १० प्रकारचे मटन ठेवले होते आणि त्याचबरोबर गाईच्या दूध, लोणी आणि कुठल्यातरी प्रकारची पाने एकत्र उकळून केलेले एक पेय होते’. १६१८ साली चिनी दूतावासातर्फे मॉस्कोला चहाच्या पेट्या पाठवल्या. ही भेट पोहोचवली ती उंटांच्या तांड्यानी. १८ महिने प्रवास करून हे तांडे मॉस्कोला पोहोचले. चहाचा हा रशियामधील प्रवास सुमारे १८९१ पर्यंत चालला होता. १६९९ सालापासून रशिया मधून व्यापार्‍यांचे तांडे मॉस्कोवरून केसाळ प्राण्यांची कातडी घेऊन त्याबदल्यात सोने, चांदी, रेशमी कापड आणि चिनी मातीच्या भांड्यांनी भरलेला माल आयात करत. दर तीन वर्षांनी हे तांडे चीनला भेट देत असल्याच्या नोंदी केलेल्या आहेत. साधारणतः १७ व्या शतकाच्या शेवटाला चहाची ओळख रशियाला झाली आणि चीनमधून चहाची आयात सुरू झाली. यानंतर १७२७ साली क्याख्ता या रशिया आणि चीनच्या सीमेवरच्या गावात चहाच्या व्यापारासाठी मोठा बाजार वसवला गेला. चिनी व्यापार्‍यांकडून चहा वायव्येकडील फुजियान परगण्यातून सुमारे १५०० मैलांचा प्रवास करून क्याख्ता येथे पोहोचवला जात असे. चहाची पाने लाकडी खोक्यांमधून वाहून नेली जात. रशियन व्यापार्‍यांनी जास्त प्रमाणात चहा नेता यावर एक शक्कल लढवली. चहाची पाने दाबून त्यापासून वड्या केल्या जात. अशा वड्या पाठवणे सोपे तर होतेच व त्यामुळे जास्त प्रमाणात चहा पाठवणे शक्य झाले.

चहाच्या वड्या

उन्हाळी दिवसांमधे एका बैलगाडीत सुमारे ४०० पौंड चहा लादून तर हिवाळी दिवसांमधे उंटांवर साधारणतः २८० पाऊंड चहा लादून रशियात नेला जात असे. ज्या मार्गानी हा प्रवास चाले तो मार्ग अत्यंत खडतर तर होताच त्याचबरोबर या मार्गांवर लुटालूट करणार्‍या अनेक टोळ्या कार्यरत होत्या. १८२९ साली ९६७० उंट आणि २७०५ बैलगाड्या यांवर चहा लादून मॉस्कोला रवाना झाल्याची नोंद आहे. १८६९ साली सुएझ कालवा चालू झाल्यावर समुद्रमार्गे जास्त सुरक्षितपणे चहा रशियात पोहोचू लागला. १८९१ साली जेव्हा ट्रान्स-सैबेरीयन लोहमार्ग चालू झाला आणि हा तांड्यांकरवी चालणारा चहाचा व्यापार बंद झाला. रशियाने चहाच्या संबंधीत एका वस्तूची देणगी जगाला दिली ती म्हणजे ’सामोवार’. चहासाठी लागणारे पाणी गरम ठेवणार्‍या या सामोवारची रचना आपल्या पाणी गरम करणार्‍या बंबासारखी असते. मध्यभागी असलेल्या नळकांड्यात निखारे टाकून पाणी गरम ठेवले जाते. तांब्यापासून बनवलेले हे सामोवार त्यावर बारीक नक्षीकाम करून सजवले जातात. आजही हे सामोवार काश्मीरमध्ये आपल्याला बघायला मिळतात. १७७८ साली Ivan Lisitsyn याने पहिल्यांदा सामोवार बनवण्याचा कारखाना मॉस्कोपासून ११० मैलांवरील तुला या गावी उघडला.

सामोवार

डचांनी चहाच्या व्यापारात आपले बस्तान बसवले त्याच सुमारास ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीलाही यात मोठा फायदा दिसला आणि १६८९ साली ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने पहिल्यांदा चहा चीनमधून इंग्लंडमध्ये आणला. त्या आधीही ईस्ट इंडिया कंपनी दुसरीकडून घेतलेला चहा इंग्लंडमध्ये आणत होती. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या चहाच्या व्यापारातील प्रवेशानंतरचा इतिहास हा युद्धाचा, पैशांच्या लोभाचा, मक्तेदारीचा आणि अनेक साहसी व अकल्पित घटनांनी भरलेला आहे.

१८ व्या शतकापर्यंत ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने कॅन्टोन येथे चांगलेच बस्तान बसवले. १६७८ सालची एक नोंद सांगते की त्या साली ईस्ट इंडिया कंपनीने (इथून पुढे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी) २१४० किलो चहा लंडन येथील बाजारात आणला. याच सुमारास ईस्ट इंडिया कंपनीचा मसाल्याच्या पदार्थांचा व्यापार कमी होत गेला आणि भारतातील स्वस्त कापसाची निर्यात इंग्लंडला होवू लागली. भारतातून आयात केलेला हा स्वस्त कापसापासून यंत्रमागांवर बनवलेले कापड हे भारतातच विकले जाऊ लागले. कापसाबरोबर भारतात अफूची शेती करण्यास ईस्ट इंडिया कंपनीने भारतातील शेतकर्‍यांना प्रोत्साहित केले. चहाच्या या व्यापारामुळे ईस्ट इंडिया कंपनी ही जगातील श्रीमंत कंपनी बनली. १७२१ सालापर्यंत ईस्ट इंडिया कंपनीने ४५ हजार किलो इतका चहा इंग्लंडमधील बाजारात विकण्यासाठी आणला. चहाच्या या व्यापारावर ईस्ट इंडिया कंपनीची मक्तेदारी निर्माण झाली. इंग्लंडमध्ये चहाची मागणी वाढू लागली तसे बाजारातील भाव कमी होत गेले. असे असले तरीही १८ व्या शतकापर्यंत चहाचे दर चढे होते. १६५० साली अर्ध्या किलो चहाची किंमत ६ ते १० पाऊंड होती. १६६६ साली हीच किंमत घसरून २ पाऊंड १५ शिलिंग झाली. १६८० साली लंडन गॅझेटमध्ये आलेल्या चहाच्या जाहिरातीत चहाची किंमत १ पाऊंड १० शिलिंग दाखवली आहे. १७०५ सालची एक नोंद या व्यापारात ईस्ट इंडिया कंपनीला किती फायदा होता हे दर्शवते. केंट या ब्रिटिश जहाजातून २८५०० किलो चहा कँटन येथे ४७०० पाऊंडला कंपनीने खरेदी केला आणि इंग्लंडमध्ये त्याचा लिलाव ५०१०० पाऊंडाना केला गेला. १८ व्या शतकापर्यंत पाश्चिमात्य देशांमधील चहाच्या व्यापारात ईस्ट इंडिया कंपनीची मक्तेदारी निर्माण झाली होती.

ईस्ट इंडिया कंपनीने चहाबरोबर चीनमध्ये चहासाठी वापरली जाणारी पोर्सेलीनची चकचकीत भांडी युरोपमध्ये नेण्यास सुरुवात केली. यिंग्झींग येथून चहाच्या किटल्या, चहाचे कप आणि बशा नेल्या जात असत. पोर्सेलीनची चकचकीत भांडी करण्याचे तंत्र हे युरोपात माहीत नव्हते. मग या चिनी भांड्यांच्या आकाराच्या चांदीच्या किटल्या, कप आणि बशा बनवल्या जाऊ लागल्या. १६५० मध्ये युरोपमधील पहिले पोर्सेलीनचे भांडे Alebregt de Keiser या डच कुंभाराने बनवले. पोर्सेलीनचे नाजूक व सुंदर चित्रकाम केलेली भांडी हे प्रतिष्ठेचे लक्षण समजले जाऊ लागले. युरोपमध्ये पोर्सेलीन बनवले जावू लागले तरी ते चिनी भांड्यांपेक्षा कमी प्रतीचे होते. चांगल्या प्रतीच्या पोर्सेलीनच्या उत्पादनामागे एक रंजक कथा दडलेली आहे.

Johann Fredrick Böttger

ह्याची सुरुवात झाली १७०१ साली. Johann Fredrick Böttger या औषधे तयार करणारा जर्मन किमयागाराच्या जीवावर बेतलेली ही कथा. Johann याने एकदा आपल्या मित्रांची आपल्याला परीस म्हणजे कुठल्याही धातूचे रुपांतर सोन्यामध्ये करणार्‍या दगड तयार करण्याचा शोध लागल्याची चेष्टा केली. ही बातमी सॅक्सोनी प्रांताच्या ऑगस्टस दुसरा या अत्यंत लोभी राजाच्या कानावर गेली. त्याने लगेचच Johann याला पकडून तुरुंगात टाकले व त्याची सुटका त्याने राजाला परीस तयार करून दिल्यावरच होईल अन्यथा त्याला फाशी दिले जाईल अशी धमकी दिली. Johann नी केलेली चेष्टा त्याच्या अंगलट आली. ऑगस्टसने परीस बनवण्याचा तगादा लावला. त्यासाठी Johannला त्याने एक प्रयोगशाळाच दिली. अनेकवेळा ऑगस्टसने Johann ला फाशी देण्याबद्दल सुनावले पण राज्यातील एक गणिती आणि वैद्य Tschirnhaus याने Johann ला वाचवले . Tschirnhaus हा अनेक वर्ष चांगल्या प्रतीचे पोर्सेलीन बनवण्याच्या मागे होता. १७०८ सालच्या ऑक्टोबरमध्ये त्याचा अचानक मृत्यू झाला. अखेर १७०८ साली Johann मिसेन येथील कारखान्यात उत्तम प्रतीचे आणि अर्धपारदर्शक पोर्सेलीन बनविण्यात यशस्वी झाला. त्याकाळी युरोपमध्ये पोर्सेलीनची किंमत ही सोन्याइतकी होती. इतका महत्त्वाचा शोध लावूनही Johann ची सुटका झाली नाही. अखेर १७१४ साली खंगलेल्या आणि आजारी Johannची सुटका ऑगस्टसने केली. सुटका केल्यानंतरही Johann च्या मृत्यूपर्यंत ऑगस्टसनी परीस बनवण्याबद्दल त्याचा पिच्छा पुरवला.

१८ व्या शतकाच्या सुरुवातीला लंडनमध्ये साधारणतः २००० कॉफी पिण्याची उपाहारगृहे होती. या उपहारगृहांमध्ये राजकारणावर चर्चा चाले, प्रेमी युगुलांसाठी ती भेटण्याची एक जागा होती. या उपहारगृहांमध्ये कॉफीबरोबर चहाही दिला जात असे. १७१७ साली लंडनमध्ये चहा देणारे उपहारगृह चालू झाले. तरी लंडनमध्ये कॉफी पिण्याचे वेड लोकांमध्ये होते. १७३० नंतर कॉफीप्रेमाला ओहोटी लागली आणि ब्रिटिश लोकांनी कॉफीचा त्याग करून चहा पिण्यास सुरुवात केली. फ्रान्समध्ये मात्र नेमके उलट झाले. तेथे लोकांनी चहाऐवजी कॉफीला स्वीकारले.

या चहाच्या प्रवासात एक प्रश्न मात्र राहतो तो म्हणजे चिनी लोकांकडून चहाच्या उत्पादनाचे रहस्य कोणी मिळवण्याचा प्रयत्न केला की नाही? खरेतर असे बरेच प्रयत्न झाले. चहाच्या बिया आणल्या गेल्या, रोपे आणली गेली पण चहाला लागणारी जमीन, हवामान आणि त्याची लागवड कशी करावी याचे ज्ञान मात्र चीनच्या बाहेर पडू शकले नाही. स्विडीश वनस्पतीशास्त्रज्ञ Carl Linnaeus याने चीनमधून चहाच्या बिया आणल्या. त्या त्याने रुजवण्याचा प्रयत्न केला पण त्या रुजल्या नाहीत. पण त्याला खात्री होती की चहाची लागवड युरोपमध्ये करणे सहज शक्य आहे. स्विडिश ईस्ट इंडिया कंपनीने चीनमधून कार्लला संशोधनासाठी चहाची रोपे पाठवली. कार्ल गुस्ताफ या जहाजाच्या कप्तानाला कार्लने सुचना दिल्या होत्या. त्याबरहुकूम कॅन्टोनमध्ये अनेक कुंड्यांमध्ये चहाच्या बिया टाकण्यात आल्या. प्रवासामध्ये या बिया रुजल्या. त्यातील २८ रोपे स्विडनमध्ये पोहोचली. पण कार्लचा होरा चुकला आणि स्विडनमधील अतिथंड वातावरणात ही रोपे रुजली नाहीत. यानंतरही अनेक प्रयत्न होत राहिले.

कौस्तुभ मुदगल

5 thoughts on “एकच प्याला… भाग २

Add yours

  1. छानच जमलीये चहाची भट्टी, कौस्तुभ.
    रशियन सामोवर वरून आठवले, मुंबईत, जहांगीर आर्ट गॅलरी बाहेर कॅफे समोवर होते….चहा- समोसा वगैरे…तिथे कायम कलाकारांचा अड्डा असे. ५-६ वर्षांपूर्वी हे हॉटेल अस्तंगत झाले.

    Like

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

Blog at WordPress.com.

Up ↑

%d bloggers like this: