आपल्या रोजच्या खाद्यजीवनाशी निगडित असलेल्या वनस्पतींपैकी एक वनस्पती अशी आहे की तिने राजकीय, सामाजिक, आर्थिक अशा सगळ्या क्षेत्रात प्रचंड उलथापालथ केलेली आहे. अनेकांच्या जिव्हाळ्याची या गोष्टीची आठवण काहीजणांना दर तासाने येत असते. भारतात दर पाच सहा दुकानांनंतर या गोष्टीचे दुकान तुम्हाला दिसेल, गप्पा रंगवताना भारतीयांना याची साथ लागतेच. जागोजागी लोक याचा आस्वाद घेताना आपल्याला दिसतात. गरीब असो वा श्रीमंत चहा हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. पण हा चहा मानवाच्या जीवनात कधी आला असावा याचा कुठलाही पुरावा मात्र सापडत नाही. हजारो वर्षांपासून मानव हा त्याला उत्तेजित करणारी पेयं बनवत आला आहे. मद्यनिर्मितीचे अनेक पुरावे लिखित साहित्यात सापडतात. आपल्या वेदग्रंथांमधे सोमवल्लीचा उल्लेख सापडतो. सोमरस हे इंद्राचे आवडते पेय होते. सोमरस हे मद्य आहे की नाही याविषयी अनेक विवाद आहेत पण सोमरस हे नक्कीच एक उत्तेजक पेय असावे. तसेच रोमन, ग्रीक संस्कृतींमध्येही तर आपल्याला अशा पेयांचे अनेक उल्लेख सापडतात. मात्र चहाबद्दल असे कुठलेही पुरावे सापडत नाहीत.
चहा ही वनस्पती आसामच्या वनांत तसेच चीनमध्ये हजारो वर्षांपासून उगवत आलेली आहे. वनस्पती शास्त्रज्ञांच्या मते या वनस्पतीचा उगम ब्रम्हपुत्रा नदीकाठच्या डोंगराळ भागात म्हणजेच आसाममध्ये सापडतो. आज आपण बघतो त्या चहाच्या शेतमळ्यांमधे ही वनस्पती साधारणतः तीन-चार फुटापर्यंत वाढलेली सापडते. पण आसामच्या वनांत ही वनस्पती एखाद्या मोठ्या झाडाप्रमाणे ४०-४५ फूट वाढू शकते. आसामप्रमाणेच ही वनस्पती म्यानमार, थायलंड आणि चीनमधील नैऋत्य भागातील डोंगरांवरही उगवते.
Camellia sinensis या लॅटीन नावाची ही वनस्पती म्हणजेच चहा. हा पहिल्यांदा पेय म्हणून वापरला गेला तो चीनमध्ये. या उत्तेजक पेयाच्या शोधाच्या अनेक दंतकथा चीनमध्ये सांगितल्या जातात. यातली एक दंतकथा अतिशय रोचक आहे आणि ती संबंधीत आहे बौद्ध धर्माशी. भारतातून चीनमध्ये धर्मप्रसाराला गेलेल्या बोधीधर्म हा साधना करत असताना झोपी गेला. जेव्हा तो जागा झाला तेव्हा त्याला स्वतःचाच राग आला आणि रागाच्या भरात त्याने आपल्या डोळ्याच्या पापण्या उपटून काढल्या आणि फेकून दिल्या. दुसर्या दिवशी जेव्हा तो साधना करण्यासाठी पुन्हा त्याच जागी परतला तेव्हा त्याच्या पापण्यांमधून एक झाड उगवले होते. त्याने त्या झाडाची पाने काढून चघळली आणि त्याला उत्साह वाटू लागला. त्यानंतर साधनेच्या दरम्यान जेव्हा त्याला झोप येत असे तेव्हा तो ही पाने चघळत असे. ही वनस्पती म्हणजेच चहा होय.

शेनॉंक हा चीनमध्ये शेतीची सुरुवात करणारा राजा इ.स.पू. २७३७ ते २६९८ राज्यावर होता. शेतीच्या विकासादरम्यान कुठली वनस्पती खाण्यायोग्य आहे हे तपासण्यासाठी सुमारे १०० वनस्पती चाखून पाहिल्या. त्यातील ७२ वनस्पतींनी तो आजारी पडला. मग त्याने चहाची पाने चघळली आणि तो बरा झाला. चीनमध्ये चहा हा सुरुवातीला औषधी वनस्पती म्हणूनच वापरला जात असे. शेनॉंगने लिहिलेल्या औषधी वनस्पतींवरील ग्रंथात tu असा चहाचा उल्लेख आला आहे. त्यावरून चहा हा चीनमध्ये इ.स.पू २७ व्या शतकात माहिती होता असे सांगितले जाते. त्यात शेनॉंगने या वनस्पतीचे वर्णन केले आहे. ’ही वनस्पती थंडीच्या दिवसात डोंगर उतारावर उगवते. अती थंडीमुळे या वनस्पतीचे काहीही नुकसान होत नाही. एप्रिल महिन्यात याची तोडणी करतात आणि वाळवतात.’ हा या पुस्तकातील उल्लेख हा सातव्या शतकानंतर घुसडण्यात आला असावा असे अभ्यासकांच्या निरीक्षणातून निष्पन्न झाले आहे. चीनमध्ये चहाचा वापर इ.स.पू. ३ र्या शतकापासून चालू झाला असे अनेक उल्लेख सापडतात. परंतु त्याचे पुरावे आज उपलब्ध नाहीत. उपलब्ध असलेला खणखणीत पुरावा आहे तो ८ व्या शतकातला.
इ.स. ७८० साली चीनमध्ये एक चहावरचे पुस्तकच लिहिले गेले. लू यू या एका कर्जबाजारी शेतकर्याने लिहिलेले या चहावरच्या पुस्तकात चहाच्या रोपांची मशागत, चहाच्या पानांची तोडणी, ही पाने सुकवून पिण्यायोग्य असा चहा बनवण्याची पध्दत, त्यासाठी लागणारी निरनिराळी उपकरणे आणि पिण्यासाठी चहा बनवण्याची कृती यांचे विस्तृत वर्णन केलेले आहे. लू यू ने हे पुस्तक लिहिले त्या कालावधीत चहा हा संपूर्ण चिनभर प्यायला जात होता. त्याच्या या पुस्तकाचे नाव होते Ch’a Ching.

चहा बद्दलची सर्व माहिती लोकांना एका पुस्तकात मिळावी या कल्पनेतून लू यूला हे पुस्तक लिहिण्याची स्फूर्ती मिळाली. लू यू बद्दलही अनेक दंतकथा सांगितल्या जातात. फू चाओ प्रांतात बाळपणी हा बौध्द भिक्षूंना सापडला व त्यांनी त्याचा संभाळ केला. त्याने बौद्ध भिक्षू बनावे असे त्याला सांभाळणार्या भिक्षूंची इच्छा होती. पण लू यू ने भिक्षू होणे नाकारले. मग त्याला मठात साधे काम देऊन त्याच्यावर ताबा ठेवण्याचा या भिक्षूंचा इरादा होता. हे लक्षात येताच लू यू तेथून पळाला. त्यानंतर त्याने आपली अनेक वर्षांची विदुषक होण्याची इच्छा पूर्ण केली. विदुषक म्हणून त्याची खिल्ली उडवली जाऊ लागली. विदुषक म्हणून वावरतानाच त्याची ज्ञानलालसा त्याला स्वस्थ बसू देत नव्हती. त्याचे हितचिंतक त्याला वेगवेगळ्या विषयांवरची पुस्तके वाचायला आणून देत असत. एके दिवशी चहाच्या व्यापाऱ्यांकडून त्याला चहाविषयी पुस्तक लिहिण्याबद्दल विचारले गेले आणि Ch’a Ching चा जन्म झाला.

Ch’a Ching हे पुस्तक तीन खंडांचे आहे. या तीनही खंडात मिळून दहा प्रकरणातून चहा संबंधीत वेगवेगळ्या विषयांची चर्चा लू यू ने केली आहे. पहिल्या खंडात चहाची उत्पत्ती आणि लागवड यावर माहिती दिली आहे. तो सांगतो ’डोंगरावर उगवणारी वनस्पती काहीवेळा इतकी वाढते की तिचे खोड हे दोन माणसांच्या कवेत मावेल येवढे मोठे होते. याची पाने Gardenia (अनंत) प्रमाणे आणि चवीने तुरट असतात. फुले दालचिनीप्रमाणे असून बिया पामच्या बियांसारख्या असतात. या झाडाला डोंगर उताराची जमीन चांगली मानवते. जंगलात उगवलेल्या झाडांच्या पानांची चव सर्वोत्कृष्ट असते. चहा हा शीतल असून उन्हाळ्यात तो तहान शमवणारा, तरतरी आणणारा असा आहे. चहा डोकेदुखी, डोळ्यांचे विकार, सांधेदुखी यावर रामबाण उपाय आहे. दिवसातून चार ते पाच वेळा तरी चहाचे सेवन केले पाहिजे. या पुस्तकाच्या दुसर्या भागात त्याने चहा बनवण्यासाठी लागणार्या उपकरणांची चित्रांसहित यादी देलेली आहे. तोडलेली पाने ठेवण्याच्या बांबूच्या करंडीपासून ते चहा पिण्यासाठी वापरण्यात येणार्या पात्राच्या स्वच्छतेसाठी वापरायच्या बारीकसारीक उपकरणांच्या नोंदी त्याने केलेल्या आहेत. तिसर्या भागात तोडलेल्या पानांची वर्गवारी कशी करावी याची माहिती दिलेली आहे. चौथ्या भागात तोडलेली पाने वाळवून त्यापासून वेगवेगळ्या उपकरणांचे उपयोग कसे करावेत याची माहिती येते. यातील पाचवा भाग अतिशय रोचक आहे. यात चहा बनविण्याच्या कृतीचे वर्णन केले आहे. तो म्हणतो ’चहाची पाने आगीवर चांगली भाजावीत. भाजताना चहाचा सुगंध येऊ लागला की भाजणे थांबवावे. चहाची पाने भाजण्यासाठी कोळशाचा उपयोग करावा. हा कोळसा तुती किंवा पाईनच्या लाकडाचा असावा. भाजलेला चहा कागदी पिशवीत ठेवावा. चहा बनविण्यासाठी डोंगराळ भागातील वाहत्या झर्यांचे पाणी सर्वोत्कृष्ट असते. पाणी तापवायला ठेवले की माशांच्या डोळ्यांप्रमाणे त्यावर बुडबुडे येऊ लागतात. त्यानंतर वाहत्या झर्यासारखा आवाज करणारे मोत्याप्रमाणे दिसणारे बुडबुडे भांड्याच्या कडेला येतात याला दुसरी उकळी असे म्हणतात. यानंतर पाण्यावर लाटांसारखे तरंग येऊ लागतात. पहिल्या बुडबुड्यांच्यावेळी पाण्यात थोडेसे मीठ टाकावे. दुसर्या उकळीनंतर बांबूच्या चमच्याने पाणी ढवळावे व पाण्यांवर लाटा येईपर्यंत त्यातून थोडे थोडे पाणी काढावे. यामुळे बनणार्या चहाची गुणवत्ता वाढते. एका कपात भाजलेल्या चहाची भुकटी घ्यावी व त्यावर उकळलेले पाणी ओतावे. ओतताना फेस येणे गरजेचे आहे. पाच कपांसाठी एक Sheng (चिनी द्रवपदार्थ मोजण्याचे प्रमाण) पाणी घ्यावे. पहिल्या व दुसर्या कपामधील चहा उत्तम असतो. चहा गरम असतानाच प्यावा. गार चहा प्यायल्याने अपचन होते.’ अशी सविस्तर माहिती तो देतो. सहाव्या भागात चहा कसा प्यावा याची माहिती दिली आहे. सातव्या भागात चहाविषयीचे पूर्वी आलेले संदर्भ दिले आहेत. आठव्या भागात चहाची लागवड करणार्या प्रांतांची यादी दिलेली आहे. नवव्या भागात पुस्तकाचा सारांश दिला आहे. शेवटचा भाग हा चहाच्या व्यापार्यांसाठी लिहिलेला असून त्यात या पुस्तकाच्या प्रती करून घ्याव्यात तसेच चहाच्या कारखान्यांमधे, चहाची विक्री आणि उपहारगृहांमध्ये यातील वेगवेगळी माहिती रेशमी कापडाच्या पट्ट्यांवर लिहून टांगावी असे म्हणले आहे. लू यू च्या या पुस्तकाचे भाषांतर लंडन विद्यापीठातील एडवर्ड रॉस यांनी केले आहे.

साधारणतः आठव्या शतकापर्यंत चीनमध्ये मोठ्या प्रमाणात चहा प्यायला जाऊ लागला. खप वाढल्यामुळे मोठ्या प्रमाणात चहाची लागवड शेतकरी करू लागले. चहाचा वाढत्या खपामुळे तेथील राजवटीने चहावर कर लावण्यास सुरुवात केली आणि सर्व शेतकर्यांना उत्पादित केलेला चहा हा सरकारलाच विकण्याची सक्ती केली. चहावर बसवलेल्या करामधून तेथील राजा डे झॉंग याला ४० दशलक्ष काश्याची नाणी कररूपाने मिळत असल्याची नोंद सापडते. पहिल्यांदा चहाच्या विक्रीवर कर बसवला गेला आणि पुढे जाऊन या चहावरील करानेच जागतिक राजकारणात प्रचंड उलथापालथ केली.
चीनमधील तांग राजवटीच्या दरम्यान आणखी एक उल्लेखनीय चहाशी संबंधित गोष्ट म्हणजे चहा पिण्यासाठी बनवलेले पोर्सेलीनचे चकचकीत वाडगे. हे वाडगे अतिशय वैशिष्ट्यपूर्ण होते आणि ते जगभर निर्यात केले जात असल्याचा एक पुरावा मिळाला. १९९८ साली दहाव्या शतकात इंडोनेशियाजवळ एका दुर्घटनेत बुडालेले एक जहाज एका जर्मन संशोधकाला मिळाले. या जहाजाच्या बांधणीसाठी वापरलेल्या सागवानी लाकडावरून ते जहाज भारतीय बनावटीचे असावे असा अंदाज त्याने केला. जहाजावर साधारणपणे ५३००० वस्तू होत्या आणि त्यापैकी ४४००० वस्तू म्हणजे चीनमधील भट्ट्यांमधे भाजलेले आणि सुंदर चमक असलेले वाडगे होते.

चहाची पध्दतशीर शेती चालू होण्याच्या आधी रानात असलेल्या या उंच झाडांवर चढून त्याची पाने खुडून आणली जात असत. दरवेळी डोंगर उतारावरील या उंच झाडांवर चढणे जिकिरीचे आणि धोकादायकही होते. यावर चीनी लोकांनी एक सोपा उपाय काढला. त्यांनी काही माकडे पाळून त्यांना झाडावर चढून पाने खुडण्याचे प्रशिक्षण दिले. माकडांकरवी चहाची पाने खुडण्याच्या तंत्राचे उल्लेख चीनी साहित्यात खूपदा सापडतात. त्यानंतर रीतसर शेती चालू झाल्यावर ही प्रथा मागे पडली.

इतिहासात चीनवर सतत बाहेरील भटक्या टोळ्यांनी हल्ले केल्याचे उल्लेख सापडतात. त्यांच्यापासून बचावासाठी चीनची जगप्रसिद्ध भिंत बांधली गेली. भिंत बांधली तरी या टोळ्यांचे हल्ले काही कमी झाले नाहीत. टोळ्यांमधील लोकांकडे जलद पळणारे घोडे होते आणि त्यामुळे त्यांना वरचेवर हल्ले करणे सहज शक्य होत असे. या हल्ल्याना तोंड देण्यासाठी आपल्या सैन्यातही घोडे असले पाहिजेत हे चिनी राज्यकर्त्यांना जाणवले. त्यांनी उझबेकिस्तानमधून घोडे चीनमध्ये आणवले. हा घोड्यांचा व्यापार चालू झाला तेव्हा घोड्याच्या बदल्यात सोने, चांदी आणि रेशीम याचा विनिमयासाठी वापर केला गेला. हान राजवटीच्या दरम्यान सुमारे ३ लाख घोडे उत्तरेकडील सीमेच्या संरक्षणार्थ ठेवण्यात आले होते. उझबेगीस्तानशी असलेला हा व्यापार फार काळ टिकला नाही कारण तेथून घोडे चीनमध्ये आणणे अत्यंत जिकिरीचे होते. दहाव्या शतकानंतर तिबेटबरोबर घोड्यांचा व्यापार केला जाऊ लागला. तिबेटमधील गवताळ कुरणामध्ये चरणारे हे घोड्यांचे वाण चांगलेच काटक होते. तिबेटी लोकांनी चहाच्या बदल्यात या व्यापाराला सुरुवात केली. इ.स. ११०५ साली घोड्याची किंमत सांगणार्या एका कोष्टकात एका चांगल्या प्रतीच्या घोड्याच्या बदल्यात २५० कॅटीज (कॅटीज हे वजनाचे चीनी माप)म्हणजे साधारणपणे १५० किलो चहा द्यावा लागत असे अशी नोंद सापडते.
याच कालखंडात मंगोल टोळ्यांचे हल्ले चीनवर चालू झाले. चेंगिझ खानने चीनी राजवटीला आपल्या हल्ल्यांनी जेरीस आणले. १३३२ साली मंगोल राजवैद्याने लिहिलेल्या पुस्तकात चहाचा उल्लेख आलेला आहे. ’चहा बनवताना ते चहामध्ये लोणी आणि चीज टाकतात. त्याला ते Chao cha (Fried Tea) असे म्हणतात. चहाची पाने लालसर भाजून ती लोणी आणि चीजबरोबर उकळली जातात.’ असे तो म्हणतो. याच काळात मंगोल राजवटीचा तिबेटी लोकांशी संपर्क झाला. तिबेटमधला बौध्द धर्माची ओळख या मंगोल टोळ्यांना झाली. १६ व्या शतकात लयाला गेलेली मंगोल राजवट अलतान खान याने पुन्हा उभी केली. १५७८ साली त्याने तिबेटमधल्या सर्वोच्च धर्मगुरू Sonam Gyasto या लामास भेटीस बोलावले. Gyasto या तिबेटी शब्दाचा अर्थ समुद्र असा होतो. समुद्राला मंगोल भाषेत दलाई हा शब्द आहे. या दोघांच्या भेटीमध्ये अलतान खानने लामांचा उल्लेख ’दलाई लामा’ असा केला आणि तिबेटमधील सर्वोच्च लामांना ’दलाई लामा’ हा शब्द रुढ झाला.
कुब्लाई खानच्या राजवटीमध्ये मंगोल आणि पर्शिया यांच्यामध्ये व्यापार चालत असे. याच काळात रशिद अल दिन या पर्शियन अभ्यासकाने चिनी राजवट व तेथील शेतीवर ’किताब ई वा अहया’ हा ग्रंथ लिहिला आहे. त्यात त्याने चहाचा उल्लेख केलेला आहे. ’चहाची पाने एका छोट्या चक्कीमध्ये वाटून कापूर, कस्तुरी आणि इतर पदार्थांबरोबर मिसळून तयार केला जातो. सरकारी अधिकारी हा चहा कागदात गुंडाळतात आणि त्यावर सरकारी शिक्का मारला जातो. शिक्का नसलेला चहा हा बाजारात विकण्यास मनाई आहे.’
जपानी लोकांनी त्यांच्या Tea Ceremony मुळे त्यांच्या देशात चहाला उच्च स्थानावर नेऊन ठेवले आहे. जपानमध्ये चहा पोहोचला तो बौध्द भिक्षुंमुळे. ६ व्या शतकात चिनी संस्कृती, बौध्द धर्म, कला याविषयी स्मजून घेण्यासाठी जपानी राजघराण्याने काही भिक्षुंना चीनमध्ये पाठवले. परत येताना त्यांनी चहाच्या बियादेखील आणल्या आणि त्यानंतर चहाची लागवड जपानमध्येही करण्यात येऊ लागली. जपानमध्ये झेन या बौद्ध विचारसरणीचा मोठा पगडा आहे. या झेन बौध्द भिक्षुंनी पहिल्यांदा जपानमध्ये या Tea Ceremony ला सुरुवात केली. यात मुख्य नाव घ्याव लागेल ते Sen no Rikyu या १६ व्या शतकातील झेन बौध्द भिक्षुचं. त्याने जपानी Tea Ceremony मध्ये बरेच प्रभावी बदल घडवून आणले.

चीनमध्ये चहा हा आधी औषधी वनस्पती म्हणून वापरला गेला. इ.स. ३-४ शतकानंतर मात्र चहा हे चीनमध्ये लोकप्रिय पेय बनले होते. असे असले तरी चहाविषयी चीनने अतिशय गुप्तता पाळली आणि उर्वरीत जगाला चहाची माहिती होण्यासाठी १५ वे शतक उजाडावे लागले. १५ व्या शतकाच्या आधीही अनेक प्रवाशांनी चीनला भेट दिली होती. त्यांच्या प्रवासवर्णनामधे चहाविषयी तुरळक नोंदी सापडतात आणि या नोंदींकडे फारसे लक्ष दिले गेलेले नाही.
या भागात आपण इथंच थांबलेलो असलो तरीही चहाचा अजूनही बराच प्रवास शिल्लक आहे…
कौस्तुभ मुदगल
Wonderful article! Thank you very much!!
LikeLike
धन्यवाद शेखर
LikeLike
दलाई लामांच्या नावाबद्दलच्या अर्थाबाबत नवीनच कळले.बाकी लेख उत्तम झालाय.
LikeLiked by 1 person
धन्यवाद
LikeLike
छान माहिती मिळाली. धन्यवाद!
LikeLike
अतिशय उत्तम व उपयुक्त माहितीपूर्ण लेख. बऱ्याच नवीन गोष्टी समजल्या.
LikeLike
Interesting subject and very informative article!!
LikeLike