सन १७५२. भारतापुरतं बोलायचं तर मराठ्यांची सत्ता उत्तरेत आता बळकट झालेली होती आणि नानासाहेब पेशवा पुण्यातून जवळपास निम्म्या भारताचा कारभार बघत होता. भारतात ब्रिटिशांनी अजून पाय पक्के रोवलेले नसले तरी त्या दृष्टीने त्यांची वाटचाल सुरू होती. तिकडं सातासमुद्रापार अमेरिकेत मात्र त्यांचा अंमल घट्ट बसलेला होता.
सॅम्युअल आणि रिबेका ग्रीस्कॉम हे एक सामान्य जोडपं न्यूजर्सीमध्ये रहात होतं. सॅम्युअल सुतार होता, सुतारकामातून मिळणारे थोडेफार उत्पन्न व घरच्या कोंबड्या आणि बकऱ्या यावर त्याचा प्रपंच रुटूखुटू चालायचा. या भरीत भर म्हणून त्यांची तब्बल १७ लेकरं. यातल्या आठ लेकरांना काय फार आयुष्य मिळालं नाही पण उरलेली मात्र जगली. यातलंच नववं अपत्य होतं एलिझाबेथ ग्रीस्कॉम, हिचा जन्म १७५२ चा.
ग्रीस्कॉम कुटुंब ख्रिश्चन धर्मातल्या Quaker पंथाचे अनुयायी होतं. या पंथातले लोक ईश्वर हा सर्वातच आहे अशी श्रद्धा बाळगतात, कॅथॉलिक आणि प्रॉटेस्टंट यांच्यासारखा चर्च आणि धर्मगुरूकेंद्रित धर्म ते मानत नाहीत. या पंथाचे लोक कोणत्याही युद्धात भाग न घेणे, रंगीत कपडे न वापरणे, गुलाम न बाळगणे, मद्यपान न करणे इत्यादी नीतिनियम पाळतात. त्यामुळं एलिझाबेथचं लहानपण तसं शिस्तबद्द वातावरणातच गेलं
एलिझाबेथ तीन वर्षांची असतानाच सगळं ग्रीस्कॉम कुटुंब फिलाडेल्फियाल स्थलांतरित झालं. इथं एलिझाबेथ Quaker समुदायाने चालवलेल्या शाळेत जाऊ लागली. एलिझाबेथची एक आत्या शिवणकामात अतिशय तरबेज होती, तिच्या हाताखाली शिकून एलिझाबेथही लौकरच उत्तम शिवणकाम करू लागली.
शाळा संपता संपता एलिझाबेथ जॉन वेबस्टर या एका बैठकीच्या गादया गिरदया तयार करणाऱ्या गृहस्थाच्या कारखान्यात उमेदवारी करायला लागली. हे गृहस्थ गादया गिरदया तयार करण्याच्या कामाव्यतिरिक्त महागडे पडदे, पलंगपोस, लोकरी ब्लॅंकेट यांची दुरुस्ती करायचेही काम करत. उमेदवारी करताना एलिझाबेथनं हे सगळं शिकून घेतलं.
सगळं नीट चालू असतानाचा एक घोटाळा झाला, एलिझाबेथ तिच्याबरोबर काम करणाऱ्या एका तरुणाच्या प्रेमात पडली. याचं नाव होतं जॉन रॉस. प्रेमात पडायला हरकत नव्हती पण हा जॉन रॉस ग्रीस्कॉम कुटुंबाच्या दृष्टीनं ‘आपल्यातला’ नव्हता. म्हणजे जॉन हा ख्राईस्ट चर्चचा सभासद होता, त्याचे वडील चर्चमधलेच एक अधिकारी होते. एलिझाबेथच्या घरातून या प्रेम प्रकरणापायी तिला अफाट विरोध झाला आणि शेवटी एलिझाबेथ आणि रॉस घरातून पळून गेले आणि लग्न केलं. ही सगळी हकीकत १७७३ सालची.
संसार सुरू झाला हळूहळू सगळ्या गोष्टी सुरळीतपणे घडायला लागल्या. लग्नानंतर एलिझाबेथने नवीन नाव घेतलं ते म्हणजे बेटसी. बेटसी आणि रॉसने मिळून स्वतःचा व्यवसाय सुरू केला, बेटसीच्या हातात अफाट कौशल्य होतं त्यामुळं धंदा हळूहळू नावारूपाला आला. खुद्द जॉर्ज वॉशिंग्टनच्या शयनगृहाच्या सजावटीचे काम करायची संधीही त्यांना मिळाली.
अमेरिकेत तेंव्हा स्वातंत्र्ययुद्धाला सुरुवात झालेली होती, कॉन्टिनेटल आर्मी या नावानं सैन्य जमवून जॉर्ज वॉशिंग्टन वगैरे मंडळींनी मोठीच धामधूम सुरू केलेली होती. स्वातंत्र्यासाठी सैन्यात भरती होण्याच्या हाकेला प्रतिसाद देऊन रॉस सैन्यात भरती झाला आणि बेटसी एकटीनेच व्यवसाय सांभाळू लागली. रॉसचं एकूण ग्रहमान फारसं बरं नसल्यामुळंच का काय पण तो दारूगोळ्याच्या कोठारावर पहाऱ्याला असताना त्याला आग लागली आणि उडालेल्या भडक्यात रॉस ख्रिस्तवासी झाला.
बेटसीनं अपार दुःख केलं पण थोड्याच दिवसात पुन्हा आपल्या कामाला लागली. सैन्यासाठी गणवेश, तंबू, झेंडे इत्यादी गोष्टी ती पुरवू लागली. एके दिवशी संध्याकाळी जॉर्ज वॉशिंग्टन आणि त्याचे चार-दोन सहकारी बेटसीच्या दुकानात येऊन धडकले, त्यांच्याकडे झेंड्याचे एक डिझाईन होते आणि त्याप्रमाणे एक झेंडा त्यांना शिवून पाहिजे होता.
बेटसी आपल्या कामात पारंगत असल्यामुळं तिनं त्यात काही सुधारणा सुचवल्या, त्या सूचना जॉर्ज वॉशिंग्टनने व त्याच्या सहकाऱ्यांनाही पटल्या आणि त्या डिझाईन बरहुकूम बेटसीने झेंडा तयार करून या मंडळींना सुपूर्द केला. पण या लहानशा वाटणाऱ्या गोष्टीमागे मात्र मोठा इतिहास लपलेला होता.
जॉर्ज वॉशिंग्टन जे डिझाईन घेऊन आलेला होता ते डिझाईन अमेरिकेच्या राष्ट्रध्वजाचे होते, या झेंड्यावर १३ लाल,पांढरे पट्टे आणि १३ चांदण्या होत्या. हे अमेरिकेन संघराज्यात सामील झालेल्या तेंव्हाच्या १३ राज्यांचे प्रतिक होते. बेटसीने सुचवलेला बदल म्हणजे डिझाईनमध्ये ज्या चांदण्या होत्या त्यांना सहा टोकं होती, त्याऐवजी पाच टोकांच्या चांदण्या करणे कारण त्या करणं अधिक सोपं होतं.

यथावकाश हा झेंडा फडकला, बेटसीही आपल्या आयुष्यात गुंतत गेली. १७७७ मध्ये तिनं दुसरं लग्न केलं, जोसेफ अँशबर्न हा तिचा नवरा मर्चंट नेव्हीत होता. दुर्दैवाने त्याचं जहाज ब्रिटिशांनी पकडलं आणि तो तुरुंगात पडला. वर्षभरात जहाजवरचे सगळे खलाशी सुटले पण सुटकेच्या आधी थोडेच दिवस जोसेफ तुरुंगात मरण पावला. बेटसीने हिंमत हरली नाही आणि तिने पुन्हा एकदा लग्नाची गाठ बांधली. तिचा तिसरा नवरा होता जॉन क्लेपूल. तिचं हे लग्न मात्र ३४ वर्ष टिकलं.पुरती म्हातारी म्हणजे ७६ वर्षांची होईतो बेटसी आपलं दुकान सांभाळत होती.
आपल्या नातवंड-पतवंडाना बेटसी तिने शिवलेल्या पहिल्या अमेरिकेच्या झेंड्याची गोष्ट नेहमी खुलवून सांगत असे. ती १८३६ साली ख्रिस्ताघरी गेली. १८७० साली तिचा नातू विल्यम कॅनबीने त्याच्या आजीने सांगितलेली अमेरिकन झेंड्याची गोष्ट हिस्टोरीकल सोसायटी ऑफ पेनसिल्व्हेनियामध्ये मांडली. या गोष्टीला अर्थातच काहीही कागदोपत्री पुरावा नव्हताच. पण विल्यम कॅनबीनं पुरावा म्हणून घरच्या सगळ्या मंडळींचे त्यांनी ही हकीगत बेटसीकडून ऐकल्याचे प्रतिज्ञापत्रच सादर केले. या सगळ्यामुळे बेटसी एकदम अमेरिकाभर प्रसिद्ध झाली.

पुढच्या काळात झेंड्याच्या श्रेयावरून अनेक वाद-प्रतिवाद झाले,इतिहासकारांनी हे सगळे दावे फेटाळून लावले. पण १९५२ साली अमेरिकन सरकारने बेटसीच्या जन्माला दोनशे वर्ष झाल्याच्या निमित्याने तिच्यावर एक टपाल तिकीट काढून तिच्या या कार्याची पोचपावती दिली.

अतिशय माहितीपूर्ण लेख.👌
LikeLiked by 1 person