व्हायरस म्हणजे विषाणू एक अद्भुत सजीव की निर्जीव. म्हणजे अगदी ’सजीव म्हणू की निर्जीव रे’ अशी स्थिती कारण? कारण असं की विषाणू मग प्रकारचा असो तो केवळ न्युक्लिक आम्ल आणि प्रथिनांचं आवरण याच्या मिलाफातून तयार झालेले एक संयुग . कोणत्याही विषाणूला कोणतीही जीवन प्रक्रिया नाही. म्हणजे पचन संस्था, श्वसन संस्था, मज्जासंस्था किंवा उत्सर्जन संस्था नाही. आहे ती केवळ प्रजनन क्षमता त्यासाठी विषाणूला एक आश्रय हवा असतो. तोसुद्धा अतिशय विवक्षित. कोरोना विषाणूला आवश्यक आश्रय म्हणजे मानवी श्वसन संस्था याखेरीज कोणत्याही संस्थेवर तो हल्ला करणार नाही. त्याला आपली प्रजा उत्पन्न करण्यासाठी केवळ माणूसच आणि त्याची श्वसन संस्था हवी.
सध्या कोविद हा शब्द सतत आपल्या कानावर आदळतो आहे. मला आठवते ते कोविद ही राष्ट्रभाषा प्रचार समितीकडून घेतली जाणारी हिंदी भाषेची एक परीक्षा. कोविद म्हणजे जाणकार को-विद असा त्याचा अर्थ. मात्र सध्या कोविद ही लघुसंज्ञा सगळीकडे व्हायरल आहे आणि हा कोविद माणसालाच काय पण वैज्ञानिकांनाही अजून नीट समजत नाहीये एका अर्थाने व्हायरल झालेला कोविद ही आपली परीक्षाच घेतो आहे असे म्हणावे लागेल.
एरवी कोणताही विषाणू म्हणजे केवळ एक रसायनच असते. ते बाटलीत भरून ठेवता येतात. अनेक वर्षानंतरही बाटलीतून काढून त्यांच्या आवडत्या पेशी मिळाल्या की प्रजनन सुरू करतात.
कोणतेही विषाणू हे सूक्ष्मातिसूक्ष्म असतात. ज्यातून जिवाणू जाऊ शकणार नाहीत अशा फिल्टर मधूनही ते सहज ये-जा करतात. म्हणजे नाकाला साधा रुमाल बांधणं म्हणजे एक अगदी मानसिक संरक्षणच ठरेल.

विषाणू जवळजवळ निर्जीवच आहेत. तेव्हा त्यांच्या विरुद्ध कोणतेही प्रतिजैविक (Antibiotics) उपयोगी पडू शकत नाही. तीच गोष्ट सर्दी, पडसे फ्लूच्या विषाणूंच्या बाबतीतही सत्य आहे.
तेव्हा स्वत:ची प्रतिकारक्षमता वाढवणे हा सर्वात चांगला मार्ग. याबरोबरच संसर्ग होईल अशा जागा टाळणेही श्रेयस्कर. घाबरण्याचं तर काहीच कारण नाही. सावधगिरी बाळगायची, सतत कानांवर आदळणार्या बातम्यांकडे दुर्लक्ष करायचं. किती लाख लोकं बाधित असले तरी कोरोनाचा मृत्यूदर अतिशय कमी आहे. त्यापेक्षा रस्त्यांवरील अपघातात जास्त लोक मरतात.
देवी म्हणजे Small Pox हा एक जीवघेणा विषाणूजन्य आजार होता. बुध्दिमान माणसानं त्यावर लस शोधली आणि या रोगाचे निर्मुलन केले. कोरोनावरही भविष्यात लस उपलब्ध होईल. मात्र त्यासाठी वेळ लागेल.
एक ध्यानात घ्या ! जीवसृष्टी केवल पृथ्वीवरच नांदते आहे असं नाही. बाहेर अवकाशात इतरही सूर्यमाला असू शकतात. त्यावर कोणते जीव अस्तित्वात आहेत हे आपल्याला माहीत नाही. तिथून ’कोणीही’ भटकत पृथ्वीवर येऊ शकतात. माणूस त्यांना योग्य आश्रयदाता वाटला की त्यांचे प्रजनन सुरु होणारच.
हे उपद्रवी विषाणू जातपात, धर्मभेद, वंशजात अथवा लिंगभेद मानत नाहीत. त्यांना एकच कळतं आपली प्रजा वाढवणं. सर्वच माणसं त्यांच्या दृष्टिने एकदम आदर्श आश्रयदाते आहेत. त्यांना आपण अतिरेकी दहशतवादी म्हणू शकत नाही. कारण ते स्वत:च्या वंशाची काळजी करतात.
कोरोनाचं एक वैशिष्ट्य हे की त्याच्या प्रथिनांच्या आवरणाबाहेर एक मेदावरणही असते. साबणाने हात स्वच्छ धुतले की हे मेदावरण विरघळते आणि हे मेदावरण गेले की कोरोना किंवा कोविड आपल्यावर हल्ला करण्यास असमर्थ होतो.

तर जगभरातील सगळेच शास्त्रज्ञ हात धुवून या कोरोनाच्या मागे लागले आहेत. लवकरच त्यांना त्यावर मात करण्यात यश येईल.
Thanks….. Useful information 👌👌
LikeLike