नाविका रे…

मी कोल्हापुरात जन्मलो आणि वाढलो, त्यामुळं समुद्राची संगत मला कधी फार मिळाली नाही. पण ‘आवडतो मज अफाट सागर अथांग पाणी निळे’ वगैरे नेहमीच माझ्या भावविश्वाचा भाग आहे आणि राहील. आपल्याकडं दर्यावर्दी किंवा समुद्रसफरी करणाऱ्या जुन्या लोकांच्या आठवणीही जवळपास आढळत नाहीत त्यामुळं मागच्या दोन-तीन शतकातलं भारतीयांचं समुद्रीजीवन वगैरेची माहितीही आपल्याकडं फारशी नाही. या लेखात मी ज्या विषयाला हात घातलाय त्याबद्दल मला माहिती योगायोगानंच मिळाली. मागच्या वर्षी दिवाळीत मी ‘विस्मयनगरीचा राजकुमार’ हा लेख धांडोळ्यावर लिहिलेला होता त्यात सुरुवातीलाच इंग्लंडमध्ये भारतातून गेलेल्या ज्या लोकांचा मी उल्लेख केलेला होता त्यात फारसी शिकवणारे मुन्शी, आया आणि लष्करी गडी हे होते. यातले लष्करी गडी म्हणजे शिपाई वगैरे असावेत असा माझा समज होता.

Lascar हा शब्द खरं तर लष्कर या फारसी शब्दाचं युरोपिअन रूप आहे. ब्रिटिश किंवा पोर्तुगीज यांच्या लेखी लष्कर म्हणजे तोफखान्यावर काम करणारे लोक. तसं बघायचं झालं तर लष्कर हा थोडा दुय्यम दर्जाचा शब्द आहे. पण एकूणच भारतातल्या लोकांना ब्रिटिश किंवा तत्कालीन युरोपिअन लोक दुय्यम दर्जाचे समजत. उदाहरण म्हणून सांगायचं झालं तर गोरा कामगार हा worker तर काळा कामगार coolie असायचा, गोरा सैनिक हा soldier तर काळा सैनिक sepoy असायचा याच धर्तीवर गोरे खलाशी हे seamen असायचे तर काळे खलाशी हे युरोपियनांच्या लेखी lascar असत.

१७८३ सालच्या मे महिन्यात भारताच्या पूर्व किनाऱ्यावर असणाऱ्या कोरींगा बंदरातून ‘The Lark’ नावाचं एक जहाज कडधान्यं आणि डाळी घेऊन मद्रासच्या दिशेनं निघालं. या जहाजाचा कप्तान होता डीन नावाचा एक इंग्रज मनुष्य. हा प्रवास अगदी सोपा आणि सुरक्षित होता त्यामुळं कप्तान साहेबांनी अगदी बिनघोरपणे आपलं जहाज हाकारलं. पण हे जहाज रस्त्यातच गायब झालं म्हणजे अगदी त्यावरच्या सर्व लोकांसहित गायब झालं. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या समितीला आधी वाटलं की हे जहाज फ्रेंचांनी पळवलं असावं पण सखोल तपास केल्यावर सत्य बाहेर पडलं. जहाजाचे कप्तान डीनसाहेब हे मुलखाचे कडक आणि शिस्तीचे भोक्ते होते. जहाजावरच्या भारतीय खलाशांना शिस्तीच्या नावाखाली ते वेळोवेळी चाबकाने फोडून काढत. वारंवार घडणाऱ्या या गोष्टींनी हे खलाशी भडकले आणि एक दिवस त्यांनी जहाजाच्या कप्तानालाच समुद्रात फेकून दिले, जहाजाला आग लावली आणि आपण किनाऱ्यावर पळून गेले.

The Lark जहाजाची ही गोष्ट काहीतरी शोधताना अचानक मला सापडली त्यानंतर शोधता शोधता माहीतीचा खजिनाच सापडला आणि lascar म्हणजे या खलाशांबद्दल आपण लिहावं असं मी ठरवलं. (या पुढं त्यांना आपण lascar असं न म्हणता खलाशीच म्हणूया.)

विदेशी जहाजांवर खलाशी भरती करण्याची सुरुवात साधारणतः अठराव्या शतकाच्या आसपास झाली, भारतातल्या डच, पोर्तुगीज फ्रेंच आणि ब्रिटिश या सगळ्यांनीच मोठ्या प्रमाणावर खलाशी भरती करायला सुरुवात केली. याचं मुख्य कारण होतं युरोपमधून ही जहाजे निघत तेंव्हा त्यांवर गोरे खलाशी असत पण भारतात पोहोचेतो त्यातले अनेकजण रोगांनी किंवा अपघाताने मरत तर काहीवेळा भारतात/ आशियात आल्यावर पळून जात. मग या जहाजांना परतीच्यावेळी खलाशांची निकड लागे मग यावेळी या जहाजांचे कप्तान इथल्या खलाशांना भरती करत. पुढच्याकाळात व्यापारी जहाजांवर हे खलाशी अगदी सर्रास दिसू लागले. ईस्ट इंडिया कंपनीच्या काळात तर सुमारे दहा ते बारा हजार खलाशी ब्रिटिश जहाजांवर काम करत असत. हे खलाशी फक्त भारतीय नसत तर मलाय,चिनी, अरब अशा सर्व वंशांचे असत. म्हणजे साधारणपणे केप ऑफ गुड होपच्या पूर्वेकडच्या भागातल्या सर्व खलाशांना साधारणपणे लष्कर म्हणून ओळखले जाई.

ब्रिटिश जहाजांबरोबर इंग्लंडला पोचलेले भारतीय खलाशी इंग्लडमध्येही चर्चेचा विषय ठरलेले होते. ईस्ट इंडिया कंपनीने त्यांची राहण्याची सोय करून द्यावी आणि त्यांच्या एकूण चरितार्थाची नीट सोय लावून द्यावी ही चर्चा ब्रिटिश संसदेतही होऊन गेली होती. कारण बरेचदा पगार, भत्ते, इतर सुविधा आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे त्यांना मिळणारी वागणूक यांमुळे वादात सापडून ते नेहमी जहाज सोडून निघून जात आणि परदेशी आपल्या दैवावर हवाला ठेऊन दिवस कंठत. हे दिवस कंठताना ते अनेक खटाटोप करत आणि अनंत भानगडीतून जगण्याचा मार्ग शोधत. आपण सुरुवातीपासून या सगळ्या मंडळींचा जरी फक्त खलाशी म्हणून उल्लेख करत असलो तरी यांच्यातही वेगवेगळी पदे आणि दर्जा होता.

Lascar-Crew_Ballaarat_c1890

१. Sea-cunny – यालाच आपल्या देशी भाषेत सुखानी असं म्हणत. याचं काम सुकाणू सांभाळणे हे असे. जहाजांचे कप्तान हे शक्यतोवर या पदावर गोरा माणूसच नेमत. अनेकदा एखाद्या भारतीय खलाशाला सुखानी म्हणून भरती करून घेतले जाई पण याच कामासाठी एखादा फिरंगी माणूस मिळताच भारतीय माणसाला सामान्य खलाशाच्या दर्जाला आणून ठेवले जाई. यावरून अनेकदा हे खलाशी बंडही पुकारत.

२. सारंग – यालाच युरोपिअन Syrang म्हणत. हा जहाजावरचा सर्वात महत्वाचा खलाशी, सर्व खलाशांचा कप्तान. याचा सर्व खलाशांवर वचक असे. डोलकाठी, नांगर, दोर आणि जहाजाच्या डेकवरची व्यवस्था वगैरे कामं सारंग सांभाळत असे. सारंग हा कप्तानाला खलाशी भरती करायलाही मदत करत असे. ‘घाटसारंग’ या नावाने ओळखले जाणारे काही लोकही बंदरांवर आढळत हे कप्तानाला खलाशी पुरवत असत.

३.तांडेल :- यालाच Tyndal म्हणूनही ओळखलं जाई. तेंव्हा जहाजं लाकडी असत त्यामुळं त्यांची वेळोवेळी डागडुजी किंवा दुरुस्ती करावी लागे. ती जबाबदारी तांडेल सांभाळी. सारंग आणि तांडेल ही जोडी नेहमी जमलेली असे. मोठ्या जहाजांवर अनेक तांडेल असत अशा वेळी त्यापैकी सगळ्यात अनुभवी तांडेल हा ’बडा तांडेल’ म्हणून ओळखला जाई.

४. कसाब :- यालाच Kasib असंही म्हटलं जाई. याचं काम स्टोअर कीपर सारखं असे. प्राणी मारणे, अन्नधान्याचे वाटप त्याचबरोबर दिवाबत्तीची सोय करणे याच्या अखत्यारीत येई.

५. भंडारी : – Bhundaree. म्हणजे स्वैपाकी. अनेकदा अपंग खलाशीच पैशासाठी जहाजांवर भंडारी म्हणून भरती होत. हिंदू आणि मुस्लिमांचे भंडारी हे वेगवेगळे असत त्यामुळं जहाजांवर एकाहून जास्त भंडारीही असत.

६. खलाशी :- khalassies किंवा calaasees. म्हणजे सामान्य खलाशी. हे सर्व वरकड कामे करत.

७. टोपाज – Topaz किंवा Topus. हा जहाजावरचा सफाई कामगार दर्जाचा कामगार असे.

लांब पल्ल्यांच्या जहाजावर खलाशी आणि अधिकारी यांना महिनोनमहिने एकत्र काढावे लागत, संवादासाठी आधीच भाषेचा प्रश्न मोठा असे कारण खलाशांना इंग्लिशचा गंधही नसे. सारंग आणि तांडेल मोडकी-तोडकी इंग्रजी बोलत. भारतीय नावं हाक मारायला अवघड म्हणून खलाशी बरेचदा जॅक,अब्राहम,अंतानिओ,डेनिस,जॉर्ज,जेकब अशी युरोपिअन नावं घेत. युरोपिअन कप्तानांच्या सोयीसाठी Thomas Roebuck नावाच्या एका ब्रिटिश दर्यावर्दी गृहस्थाने १८८२ साली English and Hindoostanee Naval Dictionary तयार केली. यात आपल्याला समुद्रावर वापरले जाणारे असंख्य शब्द सापडतात. ज्यांचा या दर्यावर्दी आयुष्याशी काहीच संबंध नाही अशा आपल्यासारख्या लोकांनाही ती चाळून बघण्यासारखी आहे.

02

खलाशी आणि युरोपिअन अधिकारी यांच्यात अनेकदा वादाचे प्रसंग घडत आणि त्यातून बंडासारख्या घटनांना चालना मिळे. त्याला कारणेही अनेक असत. अनेकदा वैयक्तिक वादातूनही या घटना घडून येत. एखाद्या मोठ्या बंदरात पोचल्यावर जहाजे तिथं उतरवायचा माल उतरवत पुन्हा नवीन माल भरत याशिवाय पिण्याचे पाणी, अन्नधान्यही भरून घेतले जाई. यावेळी नांगरलेल्या जहाजांवर काही विशेष काम नसे तेंव्हा जहाजवरच्या सर्वानाच बंदरात जाऊन मौजमजा करायची असे. यातून समुद्रात एवढे दिवस काढलेल्या थकल्या जीवांना तेवढाच आनंद मिळत असे. अशावेळी कप्तान या खलाशांना बंदरातून फिरून येण्याची मुभा देई यातूनही अनेकदा वादविवाद होत. आजकाल जहाजांवर वेगवेगळ्या पाळ्यामध्ये काम चालते पण तेंव्हा अशी सोय नव्हती त्यामुळं या खलाशांना सतत काम करत रहावे लागे रात्री समुद्र शांत असेल त्याच दिवशी या खलाशांना शांतपणे झोपता येई. यावरूनही अनेकदा खलाशी भडकून उठत आणि बंडाचा पवित्रा घेत.

अधिकारीही काही वेळी कडक पवित्रा घेत ते खलाशांना लाथाबुक्क्यांनी तुडवून काढत. कामात झालेली चूक,उलट उत्तरं देणे अशी कारणं यासाठी पुरत. चाबकाचे फटके देणे, विस्तवाचे चटके देणे हे ही चालत असे. अनेकदा कनिष्ठ दर्जाच्या युरोपिअन अधिकाऱ्याकडून ही मारहाण करवली जाई, काही हुशार कप्तान हे काम सारंग किंवा तांडेलाकडून करून घेत. ही शिक्षा डेकवर सर्वांसमक्ष दिली जाई. काहीवेळा या हाणामारीत खलाशाचा मृत्यूही होई प्रवासात डायरी लिहिणाऱ्या अनेक प्रवाशांच्या हकीकतीतून अशा प्रसंगांचे वर्णन आढळते. अशावेळी खलाशी कुठल्याही बंदरात आपल्याविरुद्ध होत असलेल्या अशा प्रकारच्या अन्यायाविरुद्ध खलाशांसाठीच्या विशेष न्यायालयात दाद मागू शकत असे. काहीवेळा तिथं खटला चालून कप्तानाला शिक्षाही होई पण खलाशी पुरेसे पुरावे सादर न करू शकल्याने बरेचदा तो या खटल्यातून सहीसलामत सुटत असे.

काही कप्तान फारच क्रूर शिक्षा देत जसे मेलेले डुक्कर गळ्यात बांधून जहाजावर कवायत करत चालणे, नांगराबरोबर बांधून अर्धवट समुद्रात बुडालेल्या अवस्थेत दिवसभर ठेवणे, एखाद्या मुस्लिम खलाशाच्या तोंडात डुकराची आतडी किंवा शेपूट कोंबणे वगैरेही प्रकार चालत. जहाजांवर यथेच्छ शिवीगाळही चालत असे, वर उल्लेख केलेल्या Thomas Roebuck च्या शब्दकोशात शिव्याही नोंदवलेल्या आहेत. (अर्थात या शिव्या आळशी,कामचोर अशा किरकोळ स्वरूपाच्या आहेत) काही कप्तान मात्र (काही प्रमाणात) सदहृदय असत, एकदा John Adolphus Pope नावाच्या एका साहसी आणि एकांड्या प्रवाशाने एका ब्रह्मदेशी खलाशाला ‘डुक्कर’ अशी शिवी दिल्याबद्दल वीस रुपये दंड ठोठावून ती रक्कम त्या खलाशाला देण्याचा आदेश दिला होता. पण दरवेळीच असे घडत नसे एका दुय्यम दर्जाच्या युरोपिअन अधिकाऱ्यावर एका खलाशाला मारहाण केल्याबद्दल खटला भरला गेला होता. या मारहाणीचे कारण त्या खलाशाने “मी मुस्लिम असताना तू मला डुक्कर का म्हणतो” असे विचारले हे होते.

काहीवेळा असे वाद खलाशाने कप्तानाला ठार मारणे वगैरे या टोकाला पोहोचत, याची नोंद जहाजांच्या नोंदवहीत (लॉगबुक) बंड अर्थात mutiny अशी होत असली तरी याच्या मागचा हेतू आपल्या अपमानाचा बदला घेणे एवढाच असे. त्याकाळातली माध्यमे म्हणजे वर्तमानपत्रंही अशा प्रकरणांचा पाठपुरावा करून सत्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत. जीव गमावलेल्या कप्तानांच्या खुनाच्या खटल्यात नाविक न्यायालये या कप्तानाचीही पुरेपूर चौकशी करत. अशा खटल्यात साक्षीसाठी कप्तानाचे जुने सहकारी/मित्र यांनाही पाचारण केले जाई. अनेकदा आपल्या मृत्यूला कप्तान स्वतःच जबाबदार होता असेही सिद्ध होई.

खलाशात असंतोष पसरण्याची अजूनही बरीच कारणे होती. हे खलाशी भरती करण्याचे मुख्य कारणच ते स्वस्तात मिळतात हे असे. युरोपिअन खलाशांना भरती करताना त्यांच्यासाठी ज्या सुविधा पुरवाव्या लागत त्या या खलाशांना पुरवल्या जात नसत. युरोपिअन खलाशांना झोपण्यासाठी वेगळ्या खोल्या दिल्या जात, इतर खलाशी सगळ्या वातावरणात जहाजाच्या डेकवरच झोपत. त्यातही मध्येच रात्री-अपरात्री यांना उठवून कामाला जुंपले जाई. या खलाशांना पुरवले जाणारे अन्नही काही फार चांगल्या दर्जाचे नसे. सर्वसाधारणपणे डाळ,भात,तूप आणि शक्य झाल्यास खारवलेले मासे एवढाच त्यांचा आहार असे. हा शिधा जहाजांवर प्रवासाआधी भरला जाई आणि तो कमी पडला तर एखाद्या बंदरातून किंवा सफरीदरम्यान इतर जहाजांकडून उसनवार करून आणला जाई. वास्तविक बऱ्याच जहाज कंपन्यांनी या खलाशांना पुरवल्या जाणाऱ्या अन्नाच्या दर्जाबाबत सूचना दिलेल्या असत पण तरीही याबाबतीत मुद्दाम चालढकल केली जाई.

Investigator नावाच्या एका जहाजाचे काम इतर जहाजांची तपासणी करणे हे होते. त्याचा कप्तान असणार्‍या Crawford नावाचा एक ब्रिटिश गृहस्थाने १८१९ साली Discovery नावाच्या जहाजाच्या बाबतीत लिहून ठेवलेले आहे. थोड्या भाज्या आणि सकस आहार दिला तरी सुव्यवस्थेचा प्रश्न मोठ्या प्रमाणात कमी होईल, पण या जहाजाचा कप्तान Ross चे मत असे होते की या छानछोकीचा खर्च खलाशांनी आपल्या पैशातून करावा. या जहाजावरचे अनेक खलाशी मागच्या सफरीत scurvy सारख्या रोगाने मरण पावले. जे खलाशी नियमबाह्य वर्तन करत त्यांना फक्त भात आणि पाणी दिले जाई तर काही वेळा दोन-तीन दिवस उपाशी रहाण्याची शिक्षाही दिली जाई. अर्थात या शिक्षेदरम्यान कामातून कोणतीही सूट मिळत नसे. खलाशांना मदिरेचेही मोठ्या प्रमाणात व्यसन असे काही वेळा शिक्षा म्हणून ती पुरवणेही बंद केले जाई अर्थात ही शिक्षा बरीच सौम्य स्वरूपाची आहे असे मानायला हरकत नाही.

सारंगाच्या हातात तूप,कांदे अशा वस्तूंचे वाटप करणे सोपवलेले असे. तो जाती आणि धर्मनिहाय या गोष्टींचे वाटप करत असे. हे वाटप पंधरवड्यातून किंवा महिन्यातून एकदा केले जाई. या खलाशांना युरोपिअन खलाशांसारखी भोजनगृहे नसत ते डेकवरच गोलाकार बसून जेवत. अशावेळी जेवणाचे ताट मध्यभागी ठेवलेले असे ज्यात भात, तूप आणि माशाचे कालवण असे. अनेकदा जहाजावरचे अन्नधान्य खराब होई किंवा त्याचा तुटवडा पडे अशावेळी त्याचा सर्वात जास्त फटका या खलाशांना बसे. त्यांना दिवसातून एकदा किंवा दोनदाच खायला मिळे पण युरोपिअन खलाशी आणि अधिकारी मात्र नेहमीसारखे तीनदा जेवत. प्रवासादरम्यान नोंदी ठेवणाऱ्या किंवा दैनंदिनी लिहिणाऱ्या अनेक प्रवाशांनी असे दुय्यम दर्जाचे अन्न किंवा अतिशय कमी अन्न खाऊन युरोपिअन खलाशांना काम करणे शक्यच होणार नाही असे नोंदवून ठेवलेले आहे. या खलाशांच्या सोशिकतेची आणि असाह्यतेची कल्पना असल्याने त्यांना तुटपुंज्या अन्नात प्रचंड राबवून घेतले जाई.

जहाजांवर तेंव्हा पिण्याच्या पाण्याचाही साठा करून ठेवला जाई अर्थात हे पाणी साठवण्यावरही मर्यादा असत त्यामुळं हे पाणी बरेचदा संपत असे याचाही फटका या खलाशांनाच बसत असे. त्यांना पुरेसे पाणीही दिले जात नसे. १८१३ साली Asia नावाच्या एका जहाजावरच्या खलाशांनी त्यांच्या कप्तानाला समुद्रात फेकून दिले होते कारण कप्तान त्यांना पुरेसे पाणी देत नसे, केवळ तहानेपोटी त्यांनी हे कृत्य केले होते शिवाय यावेळी जहाजावर पाण्याचा तुटवडाही नव्हता हे विशेष. आपण तुटपुंज्या अन्नावर जगत असताना जहाजावरचे इतर लोक भरपेट खात आहेत हे या खलाशांना दिसत असे त्यामुळं खवळून जाऊन त्यांच्या अन्नात विष कालवण्याच्या घटनाही घडत. १८५१ साली Herald नावाच्या एका जहाजावरचे खलाशी Lawson नावाच्या त्यांच्या कप्तानाकडे अनेकदा त्यांना पुरेसे अन्नधान्य पुरवावे ही विनंती घेऊन गेले पण त्यांना या कप्तानाने दाद दिली नाही म्हणून शेवटी कप्तान व त्याची बायको कॉफी पिताना जी साखर घालत त्यात खलाशांनी विष मिळवले.

आशियाई खलाशांनाही मदिरेचे व्यसन असले तरी ते माफक प्रमाणात असे, मद्यपानानंतर खलाशी उन्मादी होणे हे फारवेळा होत नसे. पण बंडाच्यावेळी धीर यावा म्हणून अनेकदा खलाशांना मद्य पाजले जाई, काहीवेळा जहाजांचे कप्तान थंडीच्या दिवसात खलाशांना उबदार ठेवण्यासाठी माफक प्रमाणात मद्य पाजत. अफूचे व्यसन मात्र या खलाशात सर्रास आढळत असे, अफू हे खलाशी प्रवासाला सुरुवात करताना सोबत घेऊनच निघत शिवाय अनेक बंदरांतूनही हे खलाशी अफू पैदा करत. अफू तंबाखूबरोबर ओढली जाई पण अनेक कप्तान याच्यावर बंदी घालत कारण यामुळे खलाशात एक प्रकारचा थंडपणा येई आणि अफूच्या सेवनाने हळूहळू शारीरिक क्षमता कमी होत जाई.

लांबच्या प्रवासात सततच्या बदलत्या हवामानात तब्बेत बिघडणे हे नित्याचेच असे पण जहाजावर सर्जन किंवा डॉक्टर असणे हे काही सक्तीचे नव्हते त्यामुळं कंपनीच्या जहाजांवर असले तरी इतर जहाजांवर डॉक्टर नसतंच. मोठ्या जहाजांवर थोडासा भाग आजारी लोकांसाठी राखून ठेवलेला असे. पण छोट्या जहाजांवर शक्य तेवढ्या जागेत ठासून माल भरल्याने मुळातच फारशी जागा शिल्लक नसे त्यामुळे आजारी खलाशांना जागा मिळेल तिथं झोपवले जाई. तिथं त्यांची काळजी घेण्यासाठीही पूर्णवेळ कोणीही नसे आणि जिथं डॉक्टर नाहीत तिथं खलाशांना आपली औषधं स्वतःबरोबर घेऊनच प्रवासाला निघायला लागत असे.

काही कप्तान मात्र आपल्या खलाशांच्या आरोग्याच्या बाबतीत अतिशय जागरूक असत. खलाशांना स्कर्वी किंवा बेरीबेरी होऊ नये म्हणून ते आवश्यक ती औषधे,हिरव्या पालेभाज्या व लिंबाचा रस वगैरे घेऊन निघत. आजारी लोकांसाठी वेगळी व्यवस्थाही केलेली असे. William Hunter नावाच्या एका डॉक्टरने लांब पल्ल्याच्या प्रवासात खलाशांना होणारे आजार यांवर १८०४ मध्ये डॉक्टर आणि जहाजांचे कप्तान यांना उपयोगी पडावे म्हणून An essay on the diseases incident to Indian seamen, or Lascars, on long voyages नावाचे एक पुस्तक लिहिले. William Hunter सारखे सदहृदय डॉक्टर खलाशांना व्यवस्थित राहण्याची सोय, बिछाने आणि हिवाळी कपडे वगैरे पुरवून त्यांचे आरोग्य नीट राखण्याचा प्रयत्न करत. पण फारच थोड्या सुदैवी खलाशांना या सुविधा मिळत. काही युरोपिअन डॉक्टर खलाशी हे प्रयोगासाठी उत्तम म्हणून म्हणूनही अशा लांब पल्ल्याच्या जहाजांवरून प्रवास करत. बरेचदा खलाशांचा युरोपिअन डॉक्टरांनी दिलेल्या औषधापेक्षा देवदेवस्की आणि मंत्रतंत्रावर जास्त विश्वास असे. हे सगळे कार्यक्रम उघडयावरच चालत असल्याने युरोपिअन लोकांना याची भीती वाटे. युरोपिअन डॉक्टरकडून उपचार करून घेणे खलाशी टाळत कारण त्यांच्या औषधाने आपला धर्मभ्रष्ट होईल असा संशय त्यांना वाटत असे.

Untitled-1

जहाजावरची धोकादायक कामं नेहमीच खलाशांकडे सोपवलेली असत कारण यांत अनेकदा त्यांचा मृत्यू झाला तरी त्यांना फारशी नुकसानभरपाई द्यावी लागत नसे. इतर खलाशीही आपल्या एखाद्या साथीदाराच्या मृत्यूचे फारसे दुःख करत नसत. १८२२ साली Margaritta नावाच्या जहाजावरून प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाच्या दैनंदिनीतील नोंदीनुसार एका खलाशाच्या मृत्यूनंतर कोणतेही अंत्यसंस्कार न करता गडबडीने त्याला समुद्रात टाकून देण्यात आले आणि इतर खलाशी पुढच्या क्षणापासून काही झालेच नाही अशा अविर्भावात आपल्या कामाला लागले. काहीवेळा अपघाताने खलाशी समुद्रात पडत पण त्यांना वाचवण्याचे कोणतेही प्रयत्न केले जात नसत कारण त्यासाठी जहाज थांबवावे लागे, छोटी होडी समुद्रात उतरवून खलाशाला बाहेर काढणे यात बराच वेळ जाई. १८३९ साली Tartar नावाच्या एका जहाजावरून एक खलाशी समुद्रात पडला तेंव्हा एका Diarist ने कप्तानाला त्याला वाचवण्याबद्दल विचारले असता त्याने उत्तर दिले की तो तसाही कामाचा नव्हता !

खलाशी भरती करताना त्यांना करताना जो पगार ठरवला जाई तो एकदम दिला जात नसे तर तो प्रवासात टप्प्याटप्प्याने तो दिला जाई म्हणजे मधल्या बंदरांवर जिथं जिथं जहाज थांबे तिथं थोडे थोडे पैसे दिले जात. अनेकदा हे पैसे द्यायला कप्तान टाळाटाळ करत मग खलाशी एकतर बंड करत किंवा कामबंद आंदोलन करत. १८३६ साली Zoroaster नावाच्या जहाजावरचे सगळे खलाशी जहाज सुमात्राला पोहोचल्यावर उतरून चालते झाले कारण कप्तानाने त्यांना ठरलेल्या पगारापैकी एक दमडाही दिला नव्हता. काही वेळा या गोष्टीला हिंसक वळणही लागत असे, १८१३ साली Arabella जहाजावरचे खलाशी पगार न मिळाल्याने भडकले आणि त्यांनी कप्तानाचा खून केला.

मध्ययुगात धर्म हा जीवनातील एक महत्वाचा घटक होता, लोकांच्या रहाणीमानातून, सवयीतून आणि खाण्यापिण्याच्या पद्धतीतून सतत जाणवत असे आणि समुद्रीजीवन ही त्याला अपवाद नव्हते. भारतात हिंदू आणि मुस्लिम एकूणच जहाज आणि समुद्रप्रवास या बाबतीत काही प्रमाणात अतिश्रद्धाळू होते. या दोन्ही धर्मात समुद्रीप्रवास सुखकर व्हावा म्हणून मदत करणारे काही संत असत. (आणि अजूनही आहेत) काही खलाशी त्यांच्या देवतांची चित्रं किंवा छोट्या मूर्तीही सोबत ठेवत तर काही खलाशी जादूटोण्यापासून बचाव करण्याचे मंत्र असलेली पुस्तकंही सोबत बाळगून असत. मजेची गोष्ट अशी की अनेक खलाशी फक्त जहाजावर मुस्लिमधर्माचे पालन करत कारण त्यांच्या दृष्टीने तो आचरणात आणायला सगळ्यात सोपा असे. जहाजांवर धर्मांतराचे प्रकारही चालत १८५१ साली Fawn नावाच्या एका जहाजावर तीन मुस्लिम खलाशांना फाशीची शिक्षा सुनावली गेली कारण धर्मांतराला विरोध करताना त्यांच्या हातून एका युरोपिअन अधिकाऱ्याचा मृत्यू झाला. धर्मांतर फक्त जहाजावरच होत नसे तर बंदरांवरही होत असे. फक्त मध्यपूर्वेतल्या आणि आफ्रिकेतल्या मागास भागातच नाही तर लंडनमध्येही तिथं उतरलेल्या खलाशांवर धर्मांतराचे प्रयोग होत.

हिंदू आणि मुस्लिम (आणि भारतीय ख्रिश्चनही) खलाशांचा जादूटोणा, करणी अशा गोष्टींवर प्रचंड विश्वास असे. जहाजावर होणारे अपघात, बदलते किंवा बिघडणारे समुद्रातील वातावरण याचा त्यांच्यापद्धतीने अर्थ काढून ते त्याप्रमाणे वेगवेगळे उपाय करत म्हणजे एखादया ठराविक दिवशी समुद्रात किंवा जहाजाला बळी देणे, जहाजावर ठिकठिकाणी नाणी ठोकणे असे प्रकार चालत आणि कप्तानही अशा गोष्टींना फार विरोध करत नसत. काहीवेळा खलाशांत भुताच्या अफवाही पसरत त्यांच्या एखाद्या नुकत्याच मरण पावलेल्या सहकाऱ्याचा आत्मा जहाजावर असल्याचा साक्षात्कार काहीना होई तर काहीवेळा समुद्रातल्या दुष्ट शक्ती जहाजाचा ताबा घेत. काहीवेळा या भुताच्या अफवांमुळे जहाजावरचे काम ठप्प होई त्यामुळे कप्तान चिडून जाऊन ज्यांनी भुताला प्रत्यक्ष (!) पाहिलेल्या खलाशांना चाबकाने फोडून काढत असे. Leyden नावाच्या एका प्रवाशाने १८०५ साली त्याच्या सफरीचे अनुभव नोंदवताना काही खलाशांनी जहाजवरच्या एका युरोपिअन अधिकाऱ्यामुळे जहाजावर दुर्दैवी घटना घडत असल्याचा समज करून घेतला होता आणि त्याच्या आज्ञा पाळणे नाकारले अशी आठवण सांगितली आहे.

खलाशांच्या धार्मिक भावना शक्यतोवर न दुखावण्याचा कप्तानांचा प्रयत्न असे पण जहाजाच्या डेकवर दिवसातून पाचवेळा नमाज पढणे हे इतर प्रवासी किंवा खलाशांनाही त्रासाचे होत असे. रमजानच्या महिन्यातला उपास आणि त्यामुळं खलाशांच्या कामावर होणारा परिणाम याबद्दलही कप्तान नाखूष असत पण याला विरोध केला तर विनाकारण असंतोषाची ठिणगी पडेल याचीही त्यांना जाणीव असे. असंतोषाचे दुसरे कारण म्हणजे धर्मांतराची भीती त्यामुळं अनेक कप्तान मिशनरी लोकांना आपल्या जहाजावरून घेऊन जाण्यास नाखूष असत किंवा बंदरात जहाज थांबले असताना त्यांना जहाजात चढूही देत नसत. १८१० साली Henry Martin नावाच्या मिशनरी गृहस्थाला एका जहाजाच्या कप्तानाने कलकत्त्याहून मुंबईला घेऊन जाण्यास नकार दिला कारण कप्तानाला तो प्रवासात खलाशांना ख्रिस्ती धर्मात आणण्याचा प्रयत्न करेल आणि विनाकारण खलाशात असंतोष पसरेल अशी भीती होती. Henry Martin ने कप्तानाला बराच वेळ पटवून देण्याचा प्रयत्न केला पण शेवटपर्यंत तो बधला नाही.

धर्मांतर होण्याचे अजून एक प्रमुख कारण म्हणजे दुसऱ्या धर्माच्या माणसाने शिजवलेले अन्न खाणे किंवा पाणी पिणे. याच्या भीतीने खलाशी आपल्या धर्मातल्या (आणि नंतर अपरिहार्यपणे जातीतल्या) लोकांबरोबरच जेवायला बसत. पण खलाशांच्या धर्माच्या हिशोबाने अन्नधान्य आणि पाणी साठवावे अशीही काहीवेळा या खलाशांची मागणी असे जी पूर्ण करणे जहाजावरच्या उपलब्ध जागेच्या हिशोबाने अवघड होई. अनेकदा जहाजावरचे अन्नधान्य संपून जाई अशावेळी समुद्रातून मासे आणि जलचर पकडून खाल्ले जात अशावेळीही खलाशी काही प्राणी खाण्यास नकार देत उदा. कितीही उपासमार झाली तरी मुस्लिम कासव खात नसत. पण जहाजांच्या कप्तानांची रास्त अपेक्षा असे की जीव धोक्यात असताना खलाशांनी धर्म बाजूला ठेवावा आणि जे उपलब्ध असेल ते खावे, काही वेळा याची सक्ती केली जाई आणि मग पुन्हा असंतोष किंवा बंड उफाळून येई.

बंडाच्या, त्यातून उदभवलेल्या रक्तपाताच्या आणि त्यात बळी पडलेल्या असंख्य निष्पाप लोकांच्या कहाण्या हे सगळे समुद्र आपल्या पोटात दडवून बसले आहेत. या हकीकती सांगायच्या तर त्यासाठी अनेक प्रसंग सांगावे लागतील अनेक घटनांची उजळणी करायला लागेल त्यामुळं आपण आपला नांगर इथंच टाकूया आणि हा प्रवास संपवूया.

ता.क.या लेखाच्या निमित्ताने मला त्याकाळातल्या जहाजांचे वेगवेगळे प्रकार समजले त्यांची नावे आणि इंटरनेटवरून शोधलेली चित्रे खाली दिलेली आहेत. जहाजं हा काही माझ्या अभ्यासाचा विषय नाही त्यामुळे तुमच्याकडे या विषयावर अधिक माहिती असेल तर ती जरूर कमेंटमधे लिहा.

ketch

Ketch

snow
Snow

(c) British Library; Supplied by The Public Catalogue Foundation
Grab

brig
Brigsloop-of-war
Sloopschooner

Schooner

barque
Barque

Lebreton_engraving-10

Cutter

यशोधन जोशी

10 thoughts on “नाविका रे…

Add yours

  1. अप्रतिम लेख
    अभिनंदन.
    मला हे लिखाण संग्रही ठेवायचे आहे.
    कृपया मला mail कराल का?

    Like

    1. खरं आहे ! मराठीत या विषयावर कुणीच लिहिलेलं नाही. आश्चर्य म्हणजे मुंबई हे त्याकाळातले महत्वाचे बंदर होते म्हणजे महाराष्ट्राला मराठी लोकांना थोड्याफार प्रमाणात तरी या विषयीची माहिती असेल तरीही कुठल्याही सामाजिक इतिहास लिहिणाऱ्या लेखकाने यांवर लिहिलेलं नाही.

      Like

  2. मित्रा, फारच वेगळा विषय.. तरीही तितक्याच सरल पद्धतीने हाताळला आहेस.. तुझे खुप कौतुक.. तुझ्या हातुन असेच वैविध्यपूर्ण लेख लिहिले जावोत याच सदिच्छा!

    Liked by 1 person

  3. फारच छान व अभ्यासपूर्वक लिहिलेला सविस्तर माहिती देणारा लेख. अभिनंदन.👌

    Liked by 1 person

  4. योगयोगाने मला हा ब्लॉग मिळाला आणि खजिना गावला, अतिशय अभ्यासपूर्ण ,सखोल लेखन आहे,हा लेख तर अत्युत्तम!!अशी माहिती प्रथमच मिळतेय,बाकी लेखसुद्धा त्याच पठडीमधील,बढीया एक्दम

    Like

  5. खूपच छान , वेगळ्या विषयावरची वेगळी माहिती व वेगळ्या खूपच छान , वेगळ्या विषयावरची वेगळी माहिती व आगळ्या वेगळ्या ढंगाने लिहिलेली, खूपच सुंदर !!

    Liked by 1 person

Leave a comment

Blog at WordPress.com.

Up ↑