धांडोळा

धांडोळा@२०२२

जगाचा वेग प्रचंड वाढलेला आहे असं आजकाल सारखं आपल्या कानावर पडत असतं आणि आपण सगळेच त्या वेगवान चक्रात अडकलेलो आहे. आपल्याकडं पूर्वी जो निवांतपणा होता तो आता नाही, कुठल्याच गोष्टीत आपला जीव आता पहिल्यासारखा फार वेळ रमत नाही. तासनतास बसून वाचायची आपली सवय आता सुटत चाललेली आहे.

काळाबरोबर आपल्यालाही बदलत गेलं पाहिजे हे आम्ही जवळपास जन्माला आल्यापासून सांगत आलेलो आहे. त्यामुळं दीर्घ लेखांबरोबरच आता ‘वेचक-वेधक’ हा एक नवीन कप्पा आता धांडोळ्यावर सुरू होतोय जिथं आपल्याला छोट्या छोट्या पण रंजक गोष्टी वाचता येतील. आजच्या भाषेत सांगायचं तर हा ‘छोटा रिचार्ज’ आहे.

कधी कधी आपण एखाद्या संदर्भासाठी पुस्तकं चाळत असतो किंवा इंटरनेट गुगलून काढत असतो. अशावेळी कामाच्या माहितीबरोबरच इतरही अनेक मनोरंजक गोष्टी आपल्याला सापडून जातात. असं होता होता आम्हाला रिकाम्या वेळात अशा गोष्टी शोधायची सवयच लागून गेली आणि आम्ही एकमेकांना त्याच्या लिंक पाठवत राहिलो.

बरेचदा कुतुहलातूनसुद्धा आम्ही अनेक गोष्टींची शोधाशोध करायला लागलो, random आणि tangent विचार हे तर आमच्या “चला शोधूया” च्या सवयीला घातलेले पाणीच होते.

असं होता होता बराच ‘डेटा’ आमच्याकडं गोळा होत गेला आणि मग आम्ही आमचा धांडोळा सर्वांसाठीच खुला करण्याचा विचार केला. त्याचीच परिणीती म्हणजे हा ब्लॉग.

विषयाचे कोणतेही बंधन न ठेवता केलेली ही खर्डेघाशी आहे. कारण नेहमीच काही नेमस्त आणि सुसंगत विचार करण्याची गरज नसते. फारशा उपयोगी नसलेल्या गोष्टीच आयुष्यात आनंद निर्माण करत असतात.

लाईफ इज ब्युटीफुल सिनेमात अंकल इलिजिओ हेच तर सांगतात.
Nothing is more necessary than the unnecessary….

संपर्क dhaandolablog@gmail.com

or follow us

Blog at WordPress.com.

Up ↑